हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा उल्लेख भावी सहकारी असा केल्यानंतर राज्यात राजकीय खळबळ उडाली असून पुन्हा एकदा शिवसेना- भाजप युती होणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता राजकारणात कोणीही कोणाचा कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र नसतो. केव्हाही काहीही चमत्कार होऊ शकतो,’ असे त्यांनी म्हटले.
महाविकास आघाडीची जी मोट बांधली गेली आहे. त्याला काही वैचारिक आधार नाही. सत्तेसाठी हे लोक एकत्रं आले आहेत. सत्ता नसतानाही शिवसेना-भाजपाने 20-25 वर्ष एकत्र राहून काम केलं आहे. त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे, असं विखे-पाटील म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. पक्षाचं हित पाहण्यापेक्षा व्यक्तिगत हित पाहण्याकडे काँग्रेसच्या मंत्र्यांचं लक्ष आहे. तर काँग्रेसने आता मुंगेरीलालचे स्वप्न पाहू नयेत, अशी टीकाही त्यांनी केली.