भाजपने ‘या’ जिल्ह्याचा पालकमंत्री बदलला; अचानक उचलबांगडीमागे कारण काय?

sanjay sawkare
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय जनता पक्ष (BJP) हा कायमच त्यांच्या धक्कातंत्रासाठी ओळखला जातो. भाजप कधी काय करेल? कोणाला बढती देईल तर कोणाचे डिमोशन करण्यात येईल याचा काहीच नेम नाही. आजही याचा प्रत्यय आला. भाजपने विदर्भात भाकरी फिरवत भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी भाजपचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे (Sanjay Sawkare) हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र, सोमवारी रात्री अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आल्याचा शासन आदेश जारी झाला. त्यानुसार संजय सावकारे यांच्या ऐवजी गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. महत्वाची बाब म्हणजे पंकज भोयर यांच्याकडे वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी आहे.

भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलल्याचा शासन आदेश सोमवारी रात्री राज्याचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी काढला आहे. या निर्णयामागे काही कारणे असल्याचं सांगितलं जात आहे. पहिले कारण म्हणजे संजय सावकारे यांच्याबद्दल असलेली नाराजी, संजय सावकारे हे फक्त झेंडा पालकमंत्री ठरु नयेत, म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजवंदनापुरता मर्यादीत राहू नये, अशी जिल्ह्यात चर्चा होती. संजय सावकारे हे जिल्हा नियोजनाच्या आढावा बैठक याव्यतिरिक्त भंडाऱ्यात जास्त फिरकत नव्हते. त्यामुळे नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित होत्या अशी चर्चा सुरु आहे. भंडाऱ्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीनंतरहीसंजय सावकारे भंडाऱ्यात आले नव्हते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता

दुसरे कारण म्हणजे संजय सावकारे यांच्यासाठी भंडारा जिल्ह्यापर्यंत येणं हा लांबचा प्रवास ठरत होता. तसेच काही स्थानिक भाजप नेते त्यांच्यावर नाराज होते अशी सुद्धा माहिती आहे. दुसरीकडे भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री केलं आहे ते पंकज भोयर हे भंडाऱ्याच्या जवळच असलेल्या वर्धा जिल्ह्यातील आहेत. पंकज भोयर यांनाही भंडारा जिल्ह्याची आणि तेथील राजकारणाची जाण आहे. अशावेळी आगामी नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची पकड आणखी मजबूत करण्यासाठी भोयर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे का? अशी चर्चा आहे.

मी आमच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानतो. मागील ६ महिन्यात केलेल्या कामाची दखल घेत वरिष्ठांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला आहे. आता माझी जबाबदारी निश्चितपणे वाढली आहे. याची जाण ठेवून भंडारा जिल्ह्यात चांगले काम करू, अशी प्रतिक्रिया पंकज भोयर यांनी दिली.