नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणादरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे प्रकरण भाजपच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. मनसेच्या या व्हिडीओ स्ट्रॅटेजीला भाजपनेही व्हिडीओनेच उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केलेल्या आरोपांचे जुने व्हिडीओ भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे भाजपकडून प्रसारीत करण्यात येत असलेल्या व्हिडीओलाही ‘लाव रे तो व्हिडीओ’ असे शीर्षक देण्यात येत आहे. त्यामुळे मनसे आणि भाजपमध्ये रंगलेल्या या व्हिडीओ वॉरची जोरदार चर्चा रंगली आहे.
मनसेकडून राज्यातील लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्यात आले नसले तरी गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर असलेले राज ठाकरे यंदा मात्र त्यांच्याविरोधात प्रचार करीत आहेत. राज ठाकरे यांच्याकडून विशेषत: मोदी आणि शाह या दोघांना लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या सभा राज्यात चांगल्याच प्रभावी ठरत असून त्याचा लाभ थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होताना दिसत आहे. दुसरीकडे राज ठाकरेंकडून मोदी आणि शाह यांनी दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्षात असलेल्या स्थितीचे व्हिडीओद्वारे पुरावेच सादर केले जात आहे. या व्हिडीओंचा भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातच येत्या २६ रोजी नाशिकमध्ये राज ठाकरेंची सभा होणार असून, त्यात मोदी, शाह यांच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले जाण्याची भीती भाजपला आहे. त्यामुळे भाजपनेही आता राज ठाकरेंना काउंटर करण्यास सुरुवात केली आहे.
राज ठाकरेंनी गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल केलेल्या आरोपांचे व्हिडीओ भाजपने व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. राज यांनी अजित पवारांवर केलेली जहरी टीका, भुजबळांवर केलेले आरोप, मोदींबाबत केलेले दावे आणि मोदी पंतप्रधान व्हावेत याबाबत व्यक्त केलेली अपेक्षा, राहुल गांधींवर केलेल्या टीकेचे व्हिडीओ भाजप समर्थकांकडून फेसबुक, ट्वीटर आणि सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओंना राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ या संवादाचेच शीर्षक दिले जात आहे. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर सध्या राज ठाकरे आणि भाजप समर्थकांच्या व्हिडीओंचीच चर्चा रंगली आहे.