हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने यंदाचा T20 विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडिया चॅम्पियन झाली. भारताच्या या विजयानंतर देशभरातून खेळाडूंचे कौतुक केलं जात आहे. मात्र भारतीय जनता पक्ष मात्र खेळाडूंऐवजी BCCI चे खजिनदार आशिष शेलारांचे अभिनंदन करा म्हणत आहे असं म्हणत राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सभात्याग केला आहे. तसेच भाजपच्या लोकांचं अभिनंदन करणे हा भारतीय खेळाडूंचा अपमान आहे असेही विरोधकांनी म्हंटल आहे.
सभागृहातून बाहेर पडल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेकी ते म्हणाले, T20 विश्वचषक भारतीय क्रिकेट संघाने जिंकला आहे. त्यासाठी सभागृहात भारतीय संघातील 11 खेळाडुंचे अभिनंदन करायला पाहिजे होते. पण भाजपचे नेते म्हणतात बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांचे अभिनंदन करा. खरंतर विश्वचषक जिंकवून देणाऱ्या खेळाडुंचं अभिनंदन केले पाहिजे, भारतीय संघाचे अभिनंदन केले पाहिजे. कारण, ते परिश्रम घेतात,मेहनत करतात . रक्ताचं पाणी करुन देशाचं नाव उंचावतात. ते सोडून बीसीसीआयमध्ये असणाऱ्या भाजपच्या लोकांचं अभिनंदन केलं जातं. हा भारतीय खेळाडुंचा अपमान आहे, देशाचा अपमान आहे, असे म्हणत अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाला देशाशी काही देणंघेणं नाही. त्यांना स्वत:चे नेते, स्वत:चा पक्ष आणि स्वत:ला ओवाळून घेण्यातच रस आहे. हा तूप लावून चमचेगिरी, चमकोगिरी करने असेच प्रकार भाजपवाले करतात. खेळात राजकारण आणणे योग्य नाही असेही दानवे यांनी म्हंटल. सभागृहात भाजपच्या नेत्याना बोलू दिले जाते मात्र विरोधकांना बोलू दिले जात नाही. हा पक्षपातीपणा आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीचे आमदार सभागृहाचा त्याग करत आहोत असं अंबादास दानवे यांनी म्हंटल. .