हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भाजपकडून राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjawal Nikam) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने याच मतदारसंघासाठी वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांचे नाव जाहीर केल्यानंतर त्यांच्या विरोधात भाजपने उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे आता उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात निकम विरुद्ध गायकवाड अशी लढत पाहिला मिळणार आहे.
खरे तर भाजपने आतापर्यंत गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या सर्व जागांसाठी उमेदवार जाहीर केले होते. परंतु यात उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघासाठी कोणत्याही उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळे या मतदारसंघातून भाजप कोणाला उभे करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज भाजपने उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघासाठी उज्ज्वल निकम यांच्या नावाची घोषणा केली आहे.
यापूर्वी उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून भाजप अध्यक्ष आशिष शेलार, अभिनेता सचिन खेडेकर किंवा पूनम महाजन यांना तिकीट देण्यात येईल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. परंतु या मधल्या काळात भाजपने उज्ज्वल निकम यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांना उत्तर मध्य जागेसाठी विचारण्यातही आले. याला निकम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर भाजपने आज उत्तर मध्य मतदारसंघासाठी निकम यांचे नाव घोषित केले.
उज्ज्वल निकम कोण आहेत?
भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेले उज्ज्वल निकम मूळचे जळगावचे आहेत. परंतु ते कामासाठी मुंबई मध्येच राहिले. आपल्या कारकिर्दीत उज्ज्वल निकम यांनी अनेक महत्त्वाचे खटले हाताळले. यात साखळी बॉम्बस्फोट, २६/११ चा दहशतवादी हल्ला अशा खटल्यांचा समावेश आहे. या कारणामुळे उज्ज्वल निकम यांचा चेहरा मुंबईकरांसाठी सुपरिचित आहे.