कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
कराड उत्तर व कराड दक्षिण मतदार संघात सध्या काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीची झुंज लावून भाजपाची व्यूहरचना सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपाचा बालेकिल्ला सातारा जिल्हा बनविण्यासाठी कराड तालुका महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. त्यामुळे राज्य पातळीवरून वेगवेगळ्या पध्दतीने या दोन मतदार संघात व्यूहरचना आखण्यास सुरूवात केली आहे. सातारा जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने कराड दक्षिण व उत्तर मतदार संघात झुंज लावली अन् आता दोन्ही मतदार संघात भाजपाने जय्यत तयारी करण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी कराड उत्तर अन् दक्षिणेत रात्रीस खेळ भाजपाच्या नेत्याकडून आतापासूनच सुरू झाला आहे. अशातच काॅंग्रेस अन् राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्येच अंतर्गत कुरघोड्या सुरू आहेत.
सातारा जिल्ह्यात एकूण 8 विधानसभा मतदार संघ आहेत. यामध्ये सातारा- जावळी, कोरेगाव, माण- खटाव, वाई- महाबळेश्वर, फलटण, कराड दक्षिण, कराड उत्तर व पाटण असे मतदार संघ आहेत. यामध्ये सातारा लोकसभा व माढा लोकसभा अशी विभागणी आहे. फलटणमध्ये राष्ट्रवादीचे दिपक चव्हाण, वाई- महाबळेश्वरला आ. मकरंद पाटील, कराड उत्तरला आ. बाळासाहेब पाटील हे तीनच आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण हे एकमेव काॅंग्रेसचे आमदार आहेत. भाजपाचे सातारा- जावळीतून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, माण- खटावमधून आ. जयकुमार गोरे तर बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे आ. शंभूराज देसाई पाटणमधून व कोरेगाव मधून आ. महेश शिंदे हे आमदार आहेत. आता आगामी निवडणूकीत यामध्ये भाजपाकडून 8 पैकी अजून 4 विधानसभा मतदार संघ आपल्याकडे घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत. पाटण व कोरेगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी व शिंदे गटात लढत असणार आहे. तर फलटण राखीव असल्याने भाजपाने तेथे मोठी तयारी केली असल्याचे दिसत नाही. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण व कराड उत्तर या मतदार संघात हालचाली सुरू केल्या आहेत. अोंड येथे रात्रीची जिल्हा कोअर कमिटीची पार पडली तर पुसेसावळी येथे धैर्यशील कदम यांच्या वाढदिवासानिमित्त ही रात्रीचाच कार्यक्रम पार पडला.
ओंड येथील बैठकीमुळे नक्की कोणाचे 12 वाजणार?
शुक्रवारी (दि. 11) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावत काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. या दौऱ्यात रात्री उशीर होवूनही जिल्हास्तरीय कोअर कमिटीची बैठक पार पडली. कराड येथे शासकीय विश्रामगृहात होणारी बैठक ओंड (ता. कराड) येथील एका कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी पार पडली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित झालेल्या या बैठकीला जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, अँड. भरत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. रात्री 12 वाजेपर्यंत ही बैठक सुरूच होती. या बैठकीत चर्चा झाली ती कराड दक्षिण व कराड उत्तर मधील फेर बदल करण्याची अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे दोन्ही मतदार संघात रात्री 12 वाजता झालेल्या बैठकीमुळे नक्की कोणाचे 12 वाजणार हे आगामी निवडणुकीनंतर कळेल. परंतु ही बैठक निर्णायक ठरणार हेही मानले जात आहे.
आ. बाळासाहेब पाटील उडून जातील : चंद्रकांत पाटील
कराड उत्तरमध्ये भारतीय जनता पक्षात सध्या दोन गट आहेत. या दोन गटामुळेच राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील यांचा विजय निश्चित होतो, हे जगजाहीर आहे. गेल्या वेळी धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे जवळपास 50 हजार मतांनी विजय मिळवला होता. परंतु कराड उत्तरमध्ये तुम्ही एकत्र निवडणूक लढविल्यास आ. बाळासाहेब पाटील हे उडून जातील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य कालच्या धैर्यशील कदम यांच्या कार्यक्रमात केले आहे. त्यामुळे आता खरोखरच कराड उत्तरमध्ये आ. बाळासाहेब पाटील व राष्ट्रवादी काॅंग्रेस विरोधात एल्गार पुकारला आहे. त्यामुळे कराड उत्तरमध्ये भाजपाने विरोधात टाकलेली पाऊले अन् कराड दक्षिणेतील मैत्री याकडे आता राष्ट्रवादी व आ. पाटील कसे पाहतात, यावर आता राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.