सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगलीत आयुक्त नगरसेवकांवर अविश्वास दाखवत असल्याने सत्ताधारी भाजपमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. त्यामुळे भाजपने आयुक्त हटाव मोहिम सुरू केली आहे. आज समाजकल्याणमंत्री सुरेश खाडे, आ.सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज देशमुख, महापौर संगीता खोत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आयुक्तांच्या बदलीची मागणी केली.
मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांच्या बदलीला ग्रीन सिग्नल दिला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपची आयुक्त हटाव मोहिम फत्ते होण्याची शक्यता आहे. आयुक्त रवींद्र खेबुडकर विकासकामांच्या फाईलीवर शेरे मारतात. नगरसेवकांवर अविश्वास दाखवतात. त्याचा परिणाम मनपाच्या विकासकामांवर झाला आहे. महापालिकेच्या आयुक्तपदावर त्यांना तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे त्यांची बदली करावी या मागणीचे निवेदन मनपाच्या पदाधिकार्यांनी तयार करून सोमवारी मुख्यमंत्र्यांकडे सादर केले.
दरम्यान महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या बदलीचे आदेश निघाल्यास त्यांच्या जागी महापालिकेचे तत्कालिन उपायुक्त व विद्यमान नागपूर महापालिकेचे उपायुक्त नितीन कापडनीस यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. शिवाय अहमदनगर महापालिकेचे उपायुक्त व तत्कालिन सांगली महापालिकेचे उपायुक्त सुनिल पवार यांच्या नावाचीदेखील चर्चा सुरू आहे.