भाजपातील दिग्गजांना पराभव पाहावा लागेल; निकाल काय सांगतोय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटलेल्या पक्षांसोबत महायुती करत त्याला मागून मनसेचं इंजिन जोडून स्वतःच्या पदरात 23 जागा पाडून घ्यायला भाजपाला यश आलं. यामध्ये अनेक विद्यमान खासदारांसोबत नवीन चेहरेही मैदानात होते. दहा वर्षात सत्तेत असणारी भाजपची कारकीर्द महाराष्ट्राच्या पचनी पडली आहे का? याचा निकालच जनता 4 तारखेला देणार आहे. फोडाफोडीच्या राजकारणाचा शिंदे गट आणि अजित पवार गट यांना लोकसभेला फटका बसल्याच्या चर्चा असताना सत्ताधारी भाजप महाराष्ट्रात किती जागांवर निवडून येतोय? भाजपच्या कोणत्या दिग्गजांना लोकसभेत पराभवाचा धक्का बसतोय? तेच सविस्तर पाहूयात,

पहिला मतदारसंघ येतो तो नागपूरचा…आरएसएसचं मेन सेंटर, भाजपचं होम ग्राउंड आणि देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या राजकारणातील स्थानामुळे नागपूरमध्ये भाजपला नेहमीच एक हात जास्तीचा मिळतो. म्हणूनच काँग्रेसच्या विकास ठाकरेंच्या विरोधात यंदाही नितीन गडकरी मोठं लीड घेतील, असं बोलले जातंय…दुसरा मतदारसंघ आहे भंडारा-गोंदियाचा…इथले भाजपचे स्टॅंडिंग खासदार सुनील मेंढे असले तरी काँग्रेसचा या मतदारसंघातील केडर बराच स्ट्रॉंग आहे. त्यामुळे भाजपच्या सुनील मेंढें आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यातील लढत घासून झाली. सुनील मेंढे यांच्या विरोधात अँटी इन्कमबन्सी असली तरी देखील भाजपने लावलेली ताकद पाहता निसटत्या हाताने का होईना पण मेंढे जिंकतील, असं बोललं जातंय…

BJP मधील दिग्गजांना पराभव पाहावा लागेल, निकाल काय सांगतोय?। Lok Sabha Election, Devendra Fadnavis

तिसरा मतदारसंघ आहे चंद्रपूरचा…विदर्भातल्या या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलय. कारण इथे काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार रिंगणात उतरले होते. बाळू धानोरकर यांच्या विषयीची सहानुभूतीची लाट, मतदारसंघात रुजलेला काँग्रेसी विचार, मोदींचा गायब झालेला करिष्मा हे सगळं चंद्रपुरात काँग्रेसच्या पथ्यावर पडणार होतं. त्यात मुनगंटीवारांकडून करण्यात आलेल्या विखारी प्रचार त्यांच्यावरच बूमरँग झाल्याने चंद्रपुरात या बड्या नेत्याला धक्का बसत पंजा फिक्स असं सध्या वातावरण आहे. चौथा मतदारसंघ आहे गडचिरोली – चिमूर भाजपचे स्टॅंडिंग खासदार अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे संजय किरसान यांच्यातील ही लढत. अनुसूचित जमातीसाठी राखीव असणारा हा मतदारसंघ भाजपासाठी वन साईड होता. मात्र आदिवासी, दलित आणि अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यांना हात घालत प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतली होती. त्यामूळे गडचिरोलीची लढत तुल्यबळ झाली. मात्र पक्षीय बलाबल आणि कागदावरचं गणित भाजपच्या बाजूने असल्याने अशोक नेते यांच्या बाजूने निकाल जाऊ शकतो.

पाचवा मतदारसंघ आहे अमरावतीचा…काँग्रेसकडून बळवंत वानखेडे विरुद्ध भाजपकडून नवनीत राणा अशी ही इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळाली. प्रहारच्या दिनेश बुब यांनी या लढतीला आणखीनच कडवं बनवलं. राणा या मतदारसंघातील प्रॉमिनंट चेहरा असल्या तरी प्रचाराच्या सुरुवातीपासूनच वातावरण काँग्रेसच्या बाजूने होतं. त्यात वंचित, आनंदराज आंबेडकर यांच्या एक्झिटमुळे मत विभाजनाचा भाजपला बसू शकणारा संभाव्य फटका टळला. याउलट प्रहारने राणांच्या पारड्यातील मतं आपल्या बाजूला घेतल्याने अमरावतीत यंदा बळवंत वानखेडे निवडून येतील, अशी चर्चा आहे. सहावा मतदारसंघ आहे अकोल्याचा…भाजपकडून अनुप धोत्रे, काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचितकडून स्वतः प्रकाश आंबेडकर इथून मैदानात होते. अकोल्यात वंचितची हक्काची वोट बँक असल्याने अभय पाटील आणि आंबेडकर यांच्यात मोठ्या प्रमाणावरील मत विभाजन यंदाही पाहायला मिळेल. दोघांची भांडण तिसऱ्याचा लाभ असं जे काही चित्र 2019 ला पाहायला मिळालं अगदी तशीच सेम टू सेम परिस्थिती असल्यामुळे भाजपच्या अनुप धोत्रे यांच्या विजयाचा मार्ग इथे सोपं झालंय…

सातवा मतदारसंघ आहे वर्धा… वर्ध्यात कमळ विरुद्ध तुतारी अशी लढत झाली. भाजपचे स्टॅंडिंग खासदार रामदास तडस विरुद्ध शरद पवार गटाचे अमर काळे यांच्यात प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसापर्यंत बरंच घमासान झालं. शरद पवारांनीही अमर काळेंसाठी बरीच फिल्डिंग लावली. पण जातीय समीकरण, महायुतीची मतदार संघातील ताकद आणि बूथ मॅनेजमेंट यामुळे वर्ध्यात पुन्हा एकदा कमळ दिसणार, असं चित्र आहे…आठवा मतदारसंघ आहे तो नांदेडचा…भाजपचे स्टॅंडिंग खासदार प्रतापराव चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण अशी ही लढत झाली. चिखलीकर यांच्या स्वतःच्या अशा एक इमेजसोबत भाजपचा बॅकअप चांगला लागल्याने नांदेडमध्येही पुन्हा एकदा कमळच फुलण्याचे चान्सेस जास्त आहेत.

नववा मतदारसंघ आहे. तो साताऱ्याचा… छत्रपती उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात जास्त अटीतटीची लढत झाली. साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत शरद पवार विरुद्ध उदयनराजेच एकमेकांच्या विरोधात होते. तेव्हा श्रीनिवास पाटलांना पुढे करत अजितदादांनी उदयनराजेंना धक्का दिला. यंदाही तिकीट मिळवण्यासाठी लागलेला वेळ आणि शशिकांत शिंदेंनी शरद पवारांना सोबत घेत केलेला वादळी प्रचार यामुळे साताऱ्यात तुतारी वाजणार, हे जवळपास प्रत्येकाच्या तोंडी आहे…दहावा मतदारसंघ आहे माढाचा…माढा हा तसा भाजपसाठी यंदा सोपा गड समजला जात होता. पण धैर्यशील मोहितेंनी तुतारी हाती घेतल्यानंतर मतदारसंघातील समीकरण बदललं. रणजितसिंह नाईक निंबाळकरांना बळ देण्यासाठी मोदींपासून ते फडणवीसांपर्यंत सर्वांनी सभा घेतल्या. पण मतदारसंघातील मोहित्यांचे प्रस्थ त्याला मिळालेली शरद पवारांच्या सहानुभूतीची लाट यामुळे माढ्यात तुतारी फिक्स वाजतेय, असा अंदाज आहे.

अकरावा मतदारसंघ आहे सोलापूरचा.. भाजपकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे हे दोन्ही नवखे चेहरे लोकसभेसाठी देण्यात आले होते. अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात गेली दोन टर्म भाजपचा दबदबा असला तरी यंदा वार फिरलं होतं. दलित, मुस्लिम मतं आणि मोहितेंमुळे मराठा मतं शिंदेंच्या बाजूने झुकल्याने सोलापुरात यंदा काँग्रेसला अप्पर हँड होता. त्यात सातपुतेंच्या प्रखर हिंदुत्वाचा मोठा इम्पॅक्ट सोलापुरात पाहायला मिळालं नाही. त्यामुळे सोलापुरात पंजा जिंकतोय, अशी परिस्थिती निर्माण झालीय…बारावा मतदारसंघ आहे सांगलीचा…सांगलीत संजय काका पाटील यांच्या विरोधात अँटी इनकंबनसी होती. त्यामुळे काँग्रेसला इथून निवडून येण्याची फुल शॉरिटी होती. पण चंद्रहार पाटलांच्या हाती मशाल देत ठाकरेंनी सांगली प्रतिष्ठेची केली. त्यामुळे विशाल पाटलांनी केलेले बंड, वंचितनं दिलेली त्यांना साथ आणि नो मशाल ओन्ली विशाल हा संपूर्ण प्रचारात दिली जाणारी घोषणा पाहता विशाल मशाल विझवत इथं खासदार होतील, असं प्रत्येकाचंच म्हणणं आहे.

तेरावा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्गचा…नारायण राणेंच्या विरोधात ठाकरेंचे विनायक राऊत मैदानात असल्याने इथला निकाल काय लागेल याची पुऱ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली आहे. राज ठाकरेंपासून ते शिंदेंच्या नेत्यांनी राणेंसाठी जीवतोड मेहनत घेतली असली तरी ठाकरेंचा बाजूने असणारा सायलंट व्होटर आणि महाविकास आघाडीने लावलेली ताकद पाहता विनायक राऊतांची मशाल आघाडी मिळवेल, असा अंदाज आहे…चौदावा मतदारसंघ आहे रावेरचा…रक्षा खडसे विरुद्ध शरद पवार गटाचे श्रीराम पवार यांच्यात इथून लढत झाली. एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपवासी झाल्याने तुतारी इथून बॅकफुटला गेली. श्रीराम पाटील यांच्यासाठी राजकारण नवं कोरं असल्यानं त्यांनी त्यांच्या परीने प्रचारात जीव ओतला होता. पण जातीय समीकरण, नाथाभाऊ यांचे सर्व पक्षीय नेत्यांशी असणारे संबंध आणि भाजपचं केडर पाहता रक्षा खडसे सलग तिसऱ्यांदा खासदार होतील, असं बोललं जातंय…

पंधरावा मतदारसंघ आहे जळगावचा…उन्मेष पाटील यांच्या खेळीने ठाकरेंना करण पवार हा आयात उमेदवार मिळाला तर भाजपने स्मिता वाघ यांना मैदानात उतरवलं. भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असल्याने जळगाव भाजपासाठी सेफ समजला जात होता. पण केळी आणि शेती प्रश्नावरून तयार केलेलं वातावरण, उन्मेष पाटील यांनी केलेल्या कामांचा सातबारा आणि महाविकास आघाडीने दाखवलेली एकजूट यामुळे जळगावात मशालीचे निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत. सोळावा मतदारसंघ आहे जालन्याचा…आपल्या सलग सहाव्या टर्मसाठी रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्या विरोधात लोकसभेला दंड थोपटले. मराठा आरक्षण हा जालन्याच्या संपूर्ण प्रचारातील ज्वलंत मुद्दा राहिला. दानवे यांच्या विरोधात मतदारसंघात यंदा बरीच नाराजी होती. पण या नाराजीचं आपल्या बाजूने कन्वर्जन करायला कल्याण काळे यांना म्हणावं असं यश येताना दिसलं नाही. मराठा मतांच्या विभाजनामुळे याचा फायदा दानवेंच्या पथ्यावर यंदाही पडतोय, असं चित्रं आहे.

सतरावा मतदारसंघ आहे पुण्याचा…भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वंचितकडून वसंत मोरे अशी झालेली ही लढत…भाजपचा बालेकिल्ला, स्ट्रॉंग केडर, शहरी मतदान, आमदारांची पाठीशी असणारी संख्या हे सगळं मोहोळांना पुण्यातून प्लसमध्ये ठेवणारं होतं. पण धंगेकरांची ताकदही इथ जोरात होती. कसब्याच्या पोटनिवडणुकीमुळे जायंट किलर ठरलेल्या रवींद्र धंगेकर यांनी इथे भाजपला कडवी टक्कर दिली. पण अगदी निसटत्या मतांनी मोहोळ इथून विजयी होतील, अशी परिस्थिती आहे. अठरावा मतदारसंघ आहे अहमदनगरचा…भाजपने 2024 लाही सुजय विखे यांनाच तिकीट रिपीट केल्यानं इथली स्थानिक समीकरण फिरली. शरद पवारांनी पवार गटात नाराज असलेल्या निलेश लंकेंना गळाला लावत त्यांच्या हातात तुतारी देत नगरची लढत रेसमध्ये आणली. पक्षांतर्गत नाराजीचा फटका यंदा विखेंना बसण्याची दाट शक्यता होती. तसेच लंके यांचं ग्राउंड पॉलिटिक्स स्ट्रॉंग असल्याने संपूर्ण प्रचारात ते वरचढ ठरले. त्यामुळे निकालाच्या दिवशीही निलेश लंकेंना नगरमधून अप्पर हॅन्ड मिळेल, अशी मतदारसंघात चर्चा आहे.

एकोणिसावा मतदारसंघ आहे बीडचा…भाजपकडून पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाकडून बजरंग बाप्पा सोनवणे अशी इथली मुख्य लढत झाली. बीड हा मुंडेंचा बालेकिल्ला असला आणि धनंजय मुंडे सोबत असतानाही ही लोकसभा निवडणूक भाजपाला जड गेली. मराठा विरुद्ध वंजारी या कास्ट फॅक्टरवर ही निवडणूक शिफ्ट झाल्याने आणि तुतारीच्या बाजूने असणारी सहानुभूती हे सगळं बजरंग बाप्पांच्या पथ्यावर पडलं. त्यामुळे 4 तारखेला मुंडेंच्या प्रस्थापित राजकारणाला इथून तुतारी मोठा धक्का देऊ शकते…विसावा मतदारसंघ आहे नंदुरबारचा…भाजपकडून हिना गावित विरुद्ध काँग्रेसकडून गोवाल पाडवी अशी इथली लढत झाली. एसटी प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात भाजप बरीच स्ट्रॉंग होती. त्यामुळे विद्यमान खासदार हिना गावित त्यांनाच तिकीट रिपीट करण्यात आलं. गोवाल पाडवी यांनी इथून तगड आव्हान उभं केलं असलं तरी निकाल शेवटी भाजपच्याच बाजूने झुकताना दिसतोय…

एकविसावा मतदारसंघ आहे दिंडोरीचा…इथेही कमळ विरुद्ध तुतारी अशी लढत पाहायला मिळाली. विद्यमान खासदार भारती पवार यांनाच भाजपने तिकीट रिपीट केलं. तर मविआमध्ये ही जागा शरद पवारांच्या वाट्याला आली. पुन्हा एकदा खासदार होण्यासाठी भारती पवार यांनी जोराचा प्रचार केला असला तरी मतदारसंघात तुतारीच्या भास्कर भगरे यांची बरीच चर्चा होती. मतदानानंतर भगरे मोठ्या लीडने दिंडोरीचं मैदान मारतील, असंही आता बोललं जाऊ लागलय.बाविसावा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पूर्वचा…इथून भाजपने मिहीर कोटेचा तर ठाकरे गटाने संजय दिना पाटील यांना मैदानात उतरवलं होतं. मतदानही काट्याला काटा असच झालं. पण सहानुभूतीचा फॅक्टर इथून वर्कआउट झाल्यामुळे मशालीचा उजेड इथं पाहायला मिळेल, असं राजकीय विश्लेषक सांगतायत…

तेविसावा मतदारसंघ आहे मुंबई उत्तरचा…मुंबई उत्तर हा भाजपचा सर्वात सेफ मतदारसंघ. म्हणूनच पक्षाने इथून पियुष गोयल यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात काँग्रेसने भूषण पाटील यांना तिकीट दिलं होतं. इथून पियुष गोयल आरामात निवडणूक जिंकतील. फक्त काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात ते कितीचं लीड घेतायत, हेच इथून पाहिलं जाणार आहे… चोविसावा मतदारसंघ आहे लातूरचा…सुधाकर शृंगारे विरुद्ध शिवाजी काळगे यांच्यात झालेल्या या लढतीत काँग्रेसने काळगेंसाठी मोठी ताकद लावली होती. पण स्टॅंडिंग खासदार सुधाकर शृंगारे हे मतदानानंतर पुन्हा एकदा निवडून येतील, असं लातूरमध्ये बोललं जातंय…

पंचविसावा मतदारसंघ आहे पालघरचा…भाजपने या मतदारसंघावर दावा ठोकत डॉ. हेमंत विष्णू सावरा यांना मैदानात उतरवले. आघाडीतर्फे ठाकरे गटाच्या वतीने भारती कामडी यांना अगोदरच उमेदवारी जाहीर केली. मात्र येथे ‘बविआ’ने अगदी शेवटच्या दिवशी राजेश पाटील यांना उमेदवारी दिली. आणि खरी लढत या तीन प्रमुख उमेदवारांमध्येच रंगली. मतदानानंतर या जागेवर भाजपच्या हेमंत सावरा यांचं पारड थोडं जड दिसतंय…सहविसावा मतदारसंघ आहे भिवंडीचा…तुतारीकडून बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे विरुद्ध भाजपकडून स्टॅंडिंग खासदार कपिल पाटील यांनाच तिकीट रिपीट केलं होतं… पाटलांच्या विरोधात असणारी अँटीइन्कमबन्सी, दोन टर्म निवडून देऊनही तसाच जिवंत असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे जनतेला बदल हवा होता… मनी आणि मसल पॉवर, सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध आणि पवारांच्या बाजूने असणारी लाट यामुळे इथं तुतारी कन्फर्म, असं बोललं जातय…

सत्ताविसावा मतदार संघ आहे उत्तर मध्य मुंबईचा…भाजपकडून उज्वल निकम विरुद्ध काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांच्यात झालेली ही लढत. अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेल्या या उमेदवारीमुळे दोघांनाही प्रचाराला अगदी थोडासा वेळ मिळाला. मात्र इथला मुस्लिम बहुल भाग आणि शिवसेनेची ताकद गायकवाड यांच्या बाजूने असल्याने पंजा निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत.अठ्ठाविसावा मतदारसंघ आहे धुळ्याचा…धुळ्यात भाजपचे स्टॅंडिंग खासदार सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्यात मुख्य लढत झाली. मात्र सुभाष भामरे यांचा मतदारसंघावरचा होल्ड आणि महायुतीने दिलेली ताकद यामुळे भामरे यांना यंदाही धुळ्यामधून अप्पर हँड आहे…तर असा होता भाजपने लढलेल्या 28 जागांचा संभाव्य निकाल. तुमचाही अंदाज असा आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.