मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! मेट्रो-3 (Colaba-Bandra-SEEPZ) प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा अंतिम टप्पा पूर्णत्वास जात असून, लवकरच BKC ते आचार्य आत्रे चौक (वर्ली) पर्यंतचा प्रवास मेट्रोने करता येणार आहे. पुढील 15-20 दिवसांत हा 9.6 किलोमीटरचा मार्ग सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
CMRS तपासणी सुरू
सोमवारपासून मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) यांच्या नेतृत्वाखाली या मार्गाची सुरक्षा व प्रणाली तपासणी सुरू झाली आहे. MMRCL (मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन) च्या प्राथमिक चाचणीत या मार्गावरील यंत्रणा योग्यरित्या कार्यरत आढळल्यानंतर CMRS ला अंतिम निरीक्षणासाठी पाचारण करण्यात आले.
6 नव्या स्थानकांसह प्रवासात सुलभता
या टप्प्यात मेट्रोचे 6 नवीन स्थानके असतील — धारावी, शीतला देवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक, वर्ली आणि आचार्य आत्रे चौक. यामुळे एकूण 33.5 किमी लांबीच्या मेट्रो-3 मार्गातील जवळपास 20 किमी प्रवास खुला होणार आहे. प्रवासी आता आरे ते वर्ली या मार्गावर मेट्रोने प्रवास करू शकतील.
मीठी नदीखाली मेट्रोचा अद्वितीय प्रवास
या टप्प्यातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे मीठी नदीखाली बांधण्यात आलेली सुमारे 915 मीटर लांब टनेल. इंजिनीअरिंगदृष्ट्या हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे. ही टनेल सुमारे 25 मीटर खोलीवर आहे, आणि ती BKC ते धारावीदरम्यान 1.4 किमी लांबीच्या नदीच्या मार्गाला पार करते.
येत्या टप्प्यात काय अपेक्षित आहे?
आरे ते BKC मार्ग आधीच प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला होता. आता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात BKC ते आचार्य आत्रे चौक टप्पा सुरू होईल. तर जुलैपर्यंत आचार्य आत्रे चौक ते कफ परेड हा शेवटचा टप्पा सुरू करण्याचे MMRCL चे उद्दिष्ट आहे.