हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिल्लीच्या सीमेवर कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत, त्याला आज (दि. 26) सहा महिने पूर्ण होत आहेत. शेतकरी संघटनेकडून आज म्हणजेच २६ मार्च रोजी ‘काळा दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. शेतकरी आंदोलकांचे नेते आणि भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी ही माहिती दिली आहे. या काळा दिवसाच्या निमित्ताने सरकारचा पुतळा जाळण्यात येईल तसेच प्रत्येक ट्रॅक्टर आणि घरांवर काळे झेंडे लावण्यात येतील. असेही राकेश टिकैत यांनी सांगितले आहे.
या आंदोलन स्थळांवर कोरोनासंदर्भातले नियम, सोशल डिस्टन्सिंग, मास्क याविषयी सतत चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना काळात हे आंदोलन काहीसं थांबलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. केंद्र सरकारने गेल्यावर्षी जूनमध्ये तीन अध्यादेश काढून शेतीविषयी तीन कायदे लागू केले. त्यांना संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताने सहमती देण्यात आली. तिन्ही कायद्यांनी शेतमालाच्या खरेदीवर, हमीभाव मिळवण्यावर विपरीत परिणाम होईल असा आक्षेप घेत पंजाब, हरियाना आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील गहू-तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. या तिन्ही राज्यांतील शेतकरी हजारोंच्या संख्येने दिल्लीकडे कूच करीत होते.
कृषि कानूनों के खिलाफ टीकरी बॉर्डर पर विरोध प्रदर्शन कर रहे किसानों ने बॉर्डर पर काले झंडे लगाकर आज काला दिवस मना रहे हैं। #FarmersProtests pic.twitter.com/Kd6Jf9vdpt
— ANI_HindiNews (@AHindinews) May 26, 2021
त्यांना दिल्लीच्या सीमेवर अडविण्यात आले. प्रचंड थंडीत अनेक शेतकरी धरणे धरलेल्या जागीच मरण पावले. केंद्र सरकारच्या प्रतिनिधी मंडळाबरोबर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, पण तोडगा काही निघाला नाही. ‘कायदे मागे घ्या’, या एकमेव मागणीवर शेतकरी ठाम राहिले, तर ‘नव्या कायद्यातील तरतुदींना असलेल्या आक्षेपांवर सरकार फेरविचार करेल, आंदोलन मागे घ्या’, अशी भूमिका सरकारने मांडली.
सदरचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आणि न्यायालयाने तिन्ही कायद्यांना स्थगिती दिली. त्यानंतर एक समिती नियुक्त केलेली आहे, मात्र आंदोलकांनी त्या समितीच्या सदस्यांच्या भूमिकेविषयीच आक्षेप नोंदविला. तेव्हापासून हा वाद ‘जैसे थे’ परिस्थितीत आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला, त्याला आता सहा महिने होत आहेत म्हणून हा दिवस काळा दिन म्हणून पाळण्याचे ठरविले आहे.