हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन BMC Election 2026 । राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. खास करून मुंबई महापालिकेवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती तर स्पष्ट दिसत आहे, तर अजित पवार गटाला भाजपचा विरोध आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे एकत्रितपणे मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जातील असं एकूण चित्र आहे. उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महापालिका निवडणूक हि अस्तित्वाची लढाई आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मेगा प्लॅन आखल्याची चर्चा सुरु आहे. त्यानुसार, मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गटाकडून ७० टक्के तरुण चेहऱ्याना उमेदवारी दिली जाऊ शकते.
ठाकरे मोठा डाव टाकणार – BMC Election 2026
यंदा मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता राखणे हे ठाकरेंसमोर सर्वात कठीण आव्हान आहे. कारण एकीकडे भाजप वाढतच चालली आहे, अनेक आजी माजी नगरसेवक भाजपच्या गोटात जात आहेत. दररोज कोणाचे ना कोणाचे पक्षप्रवेश होत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे ठाकरेंची अर्धी ताकद विभागली आहे. मुंबईत शिवसैनिकांमध्ये २ गट आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी यंदा राज ठाकरेंचा आधार घेतला आहे. मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची घोषणा कधीही होऊ शकते. याच दरम्यान, उद्धव ठाकरे मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. ठाकरेंची शिवसेना उमेदवाराची चाचणी करत असताना 70% नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती आहे. युवा सेनेतील अनेक चेहऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून उतरवले जाणार आहे. BMC Election 2026
सध्याच्या घडीला उद्धव ठाकरेंकडे एकूण 51 माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे या माजी नगरसेवकांचा विचार करून अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय वरिष्ठ नेते घेत असल्याची माहिती आहे. वय वर्ष 30 ते 45 या वयोगटातील बहुतांश उमेदवार हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार म्हणून देणार असल्याची माहिती आहे. मागील काही वर्षात केलेलं काम, तरुण इच्छुक उमेदवाराचा जनसंपर्क, वॉर्डमध्ये सोडवलेल्या समस्या या सगळ्याचा रिपोर्ट पाहूनच उमेदवारीचा निर्णय घेतला जाणार आहे. यात अंकित प्रभू, पवन जाधव, सुप्रदा फातर्फेकर, शीतल शेठ देवरुखकर, साईनाथ दुर्गे, राजोल पाटील यासारख्या अनेक युवा चेहऱ्यांची नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. काहींना तयारीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तर काहींच्या बाबत निर्णय येत्या दोन ते चार दिवसात होण्याची शक्यता आहे . ठाकरेंच्या या निर्णयाला वरिष्ठ नेत्यांचाही दुजोरा असल्याच बोललं जातेय. ठाकरेंच्या शिवसेनेला या निर्णयाचा फायदा होणार की नुकसान हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.




