सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सोनके (ता. कोरेगाव) येथील आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील शाखांमध्ये संचालकांनी जवळील नातलगांच्या नावे बोगस कर्जवाटप केले. या प्रकारामुळे 12 कोटी 87 लाख 47 हजार 734 रुपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान याप्रकरणी 21 संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
संस्थापक सुनील शामराव धुमाळ, प्रदीप उत्तमराव धुमाळ, सुधाकर जयवंतराव अनपट, रघुनाथ महादेव धुमाळ, सतीश नारायण धुमाळ, विक्रम महादेव बोराटे, संजय शिवाजी निंबाळकर, विकास नामदेव धुमाळ, निगम दगडू सोनवणे, मनीषा शशिकांत धुमाळ, सोनाली संपतराव चव्हाण, मारुती मांढरे, नारायण देशमुख, विजयकुमार भोईटे, उमेश कृष्णराव पवार, योजना परमेश्वर यादव, प्रवीण चंद्रकांत यादव, वैशाली संजय शिंदे, महेंद्र शंकर धुमाळ, संतोष उत्तमराव पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. सोनके (ता. कोरेगाव) मुख्य कार्यालय राधिका रोड सातारा, पिरवाडी- खेड, सैदापूर, वाई, शिरवळ, या शाखांमधून याच संचालकांची असलेली आदर्श वास्तू निर्मिती या कंपनीस, तसेच जवळच्या नातलगांच्या नावे बोगस कर्ज दाखवून व फिरवा- फिरवी करून पैशांचा अपहार केला आहे. सदर दाखवलेल्या बोगस कर्जामध्ये वेळोवेळी रोख भरणा केल्याचे भासवून थकबाकीत कर्ज उत्पादित दाखविले आहेत. त्यानंतर सहकार खात्याने दिलेल्या निर्देशानुसार गुंतवणूक दाखवण्यासाठी बोगले ठेव रकमेबाबतची बनावट कागदपत्रे तयार करून रामानंद मल्टिस्टेट को सोसायटी ही संस्था अस्तित्वात नसतानाही, ही संस्था असल्याचे भासवून ठेवीदारांची फसवणूक केली आहे. या अपहाराची फिर्याद सनदी लेखापाल विष्णू बाळासाहेब साळुंखे यांनी वाठार पोलिस ठाण्यात दिली असून, पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय बोंबले करीत आहेत.