चंद्रपूर प्रतिनिधी । भटक्या जाती , विमुक्त जाती , इ.मा.व आणि वि.मा.प्र समाज कल्याण मंत्रालयामार्फत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये २५ ते २६ आश्रमशाळा सुरू आहेत. मात्र यापैकी अनेक आश्रम शाळा कागदोपत्रीच असून बोगस विद्यार्थी हजेरी पटावर दाखवून शासनाकडून करोडो रुपयांचे अनुदान संस्थाचालक आणि समाज कल्याणचे अधिकारी संगनमत करून लाटत आहे असा खळबळजनक आरोप अभय मुनोत यांनी केला आहे. कोरपना तालुक्यातील नदीकाठावरील कोळशी (बु.) येथील स्व.चमनसेठ प्रा.आश्रमशाळेत सुरु असलेला गैरप्रकार उघडकीस आणत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत सर्व आश्रम शाळांची पडताळणी करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
रम्यान कोरपना तालुक्यात कोडशी ( बु.) येथे स्व. चमनसेठ प्राथ.आश्रम शाळेत १ ते ७ पर्यंत वर्ग भरतात. त्यांच्या हजेरी पटावर ७१ निवासी विद्यार्थी दर्शविले जात आहेत. मात्र आश्रम शाळेत केवळ ७ विद्यार्थी उपस्थित असतात. शाळेत कुठल्याही सोयी सुविधा नसून विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सातही विद्यार्थ्यांचे जीवन असुरक्षित असून वसतिगृह अधीक्षक, संस्थाचालक फक्त बसूनच पगार लाटत आहेत असा आरोप मुनोत यांनी केला आहे.
दरम्यान सन २०१८ – १९ मध्ये महाराष्ट्रातील सर्व आश्रम शाळांची पडताळणी जिल्हाधिकार्यांनी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश शासनाने दिले होते. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक बोगस आश्रमशाळा असल्याने या शाळांना वाचविण्यासाठी एका मंत्री महोदयाच्या राजकीय दडपणाने जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील आश्रमशाळांची पडताळणी केली नाही असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.