मुंबई । हरहुन्नरी आणि अष्टपैलू अभिनेता इरफान खान याचे निधनाच्या धक्क्यात असणाऱ्या सिनेप्रेमींना आज दुसरा जबर धक्का बसला आहे. सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचे कर्करोगाने आज मुंबईत निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. कालच अभिनेता इरफान खानचे निधन झाले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ऋषी कपूर यांनी जगातून निरोप घेतल्यानंतर त्यांच्या चित्रपट सृष्टीतील लांब करिअरचा आढावा घेताना एक कमालीची बाब समोर आली आहे. अनेकांना ऋषी कपूर यांची चित्रपट कारकीर्द ‘बॉबी’ किंवा त्याही आधी ‘मेरा नाम जोकर’ मधल्या भूमिकेतून सुरु झाल्याचं माहित आहे. मात्र, आपल्या सर्वांची ही माहिती अपुरी आहे.
ऋषी कपूर यांचा पहिला चित्रपट ‘बॉबी’ नाही तर राज कपूर यांचा श्री ४२० होता याची माहिती अनेकांना नाही. खुद्द ऋषी कपूर यांनीच या गोष्टीचा एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता. अभिनेत्री नरगिस यांनी श्री ४२० चित्रपटातील एका पात्रासाठी कशी त्यांची मनधारणी केली होती याबाबत त्यांनी सांगितलं होतं. ऋषी कपूर हे श्री ४२० या चित्रपटाती ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे या गाण्यातून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकले होते. या गाण्यात राज कपूर आणि नरगिस यांच्या मागे पावसात चालणाऱ्या ३ मुलांपैकी ते एक होते. गमतीचा भाग म्हणजे त्यावेळी लहानग्या ऋषी कपूर यांना चॉकलेट असं प्रॉमिस करत नरगिस यांनी त्यांना या गाण्यात सहभागी करून घेतली होतं.
याबाबत ऋषी कपूर यांनी मुलाखतीदरम्यान बोलताना सांगितलं होतं. “श्री ४२० या चित्रपटात मला एक शॉट द्यायचा आहे असं सांगण्यात आलं होतं. तसंच या गाण्यात माझे मोठे भाऊ आणि बहिणही होते. जेव्हाही तो शॉट असेल तेव्हा आम्हाला पावसात चालायचं होतं. पण माझ्या अंगावर जेव्हाही पाणी पडायचं तेव्हा मी जोरात रडायला लागायचो. यामुळे शूटींग पूर्ण होत नव्हतं. अखेरच्या शॉटपर्यंत तू तुझे डोळे उघडे ठेवले आणि रडला नाहीस तर मी तुला चॉकलेट देईन असं नरगिस मला म्हणाल्या होत्या. त्यानंतर केवळ चॉकलेटसाठी मी माझे डोळे उघडे ठेवले आणि तो माझा पहिला शॉट होता,” असं ऋषी कपूर यांनी सांगितलं होतं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”