बड़े दिलवाला! सोनू सूदने गरजूंच्या मदतीसाठी स्वतःची दुकाने, फ्लॅट गहाण ठेवून घेतलं 10 कोटींचं कर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी अभिनेता सोनू सूद देवासारखा धावून गेला. सोनू सूदने कशाचीही पर्वा न करता लोकांना भरभरून मदत केली. त्यामुळे त्याचं कौतुकही झालं आणि त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला? यावर संशयही व्यक्त केला गेला. पण सोनू सूदने एक-दोन नव्हे तर आपल्या तब्बल 8 मालमत्ता गहाण ठेवल्या असून त्यातून 10 कोटींचं कर्ज घेतलं आणि गरिबांना मदतीचा हात दिल्याची माहिती समोर आली आहे. (Sonu Sood mortgages eight properties in Juhu to raise Rs 10 crore for the needy)

सर्व मालमत्ता जुहूतील
लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या अडचणी पाहून अस्वस्थ झालेल्या सोनूने त्याच्या एकूण आठ मालमत्ता गहाण ठेवल्या. त्यातून त्याने 10 कोटी रुपये उभे केले आणि लोकांना सढळ हाताने मदत केली. जुहू येथील पॉश आणि हायप्रोफाईल परिसरातील 8 मालमत्ता त्याने गहाण ठेवल्या आहेत.

दोन दुकाने आणि फ्लॅट गहाण ठेवले
मनी कंट्रोल या वेब पोर्टलने याबाबतची माहिती दिली आहे. जुहू येथील दोन दुकाने आणि सहा फ्लॅट त्याने गहाण ठेवले आहेत. ही दोन्ही दुकाने तळमजल्यावर आहेत. तर शिवसागर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत त्याचे फ्लॅट आहेत. ही सोसायटी इस्कॉन मंदिराजवळील ए. बी. नायर रोडवर आहे.

पत्नीची मालमत्ताही गहाण ठेवली
या आठ मालमत्ता गहाण ठेवून त्याबदल्यात त्याने बँकेकडून 10 कोटीचं कर्ज घेतलं आहे. दस्ताऐवजानुसार त्याने 10 कोटींचं कर्ज घेण्यासाठी पाच लाख रुपये नोंदणी शुल्कही भरलं आहे. यातील काही मालमत्ता त्याची पत्नी सोनालीच्या नावावरही आहेत. मात्र, सोनूकडून याबाबतचा अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

खेड्यात मोबाईल टॉवरची व्यवस्था
लॉकडाऊनच्या काळात सोनूने अनेक प्रकारची मदत केली. लोकांना गावाला जाण्यासाठी गाडीभाडं देण्यापासून ते त्यांच्या लग्नापर्यंतचा खर्चही त्याने उचलला. हरियाणाच्या मोरनी खेड्यातील मुले स्लो-इंटरनेटमुळे हैराण झाली होती. मोबाईल नेटवर्क नसल्याने त्यांना ऑनलाइन अभ्यास करता येत नव्हता. या गोष्टींची माहिती मिळताच सोनूने त्याचा मित्र करण गिल्होत्राच्या मदतीने गावात एक मोबाईल टॉवर बसविला. ज्यामुळे आता तिथल्या मुलांना जलद इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओद्वारे सोनूला या मुलांच्या समस्येबद्दल माहिती मिळाली होती. एका व्हायरल व्हिडिओमध्ये, गृहपाठ करण्यासाठी एक लहानगा मुलगा झाडाच्या फांदीवर बसून मोबाईल सिग्नल शोधत होता. या व्हिडीओ पोस्टमध्ये सोनू आणि करण यांना या टॅग केले गेले होते, त्यामुळेच हा व्हिडीओ सोनू सूदपर्यंत पोहोचला होता.

‘मुले ही आपल्या देशाचे भविष्य असतात आणि त्यांना चांगल्या भविष्यासाठी बरोबरीची संधी मिळाली पाहिजे. मला असे वाटते की, अशा समस्यांमुळे कोणाच्याही यशाच्या मार्गात अडथळा येऊ नये. मुलांना ऑनलाईन अभ्यासात मदत करण्यासाठी मी दुर्गम गावात मोबाईल टॉवर उभारला आहे, ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आता मोबाइल सिग्नलसाठी मुलांना झाडाच्या फांद्यावर बसण्याची गरज नाही’, असे सांगत सोनू सूदने त्यांनाही मदत केली होती.

संयुक्त राष्ट्र संघाकडून सन्मान
या आधी सोनूने चंदीगडमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात सहभागी होण्यासाठी स्मार्टफोनचे वितरणही केले होते. दरम्यान, सोनूच्या या कार्याची दाखल संयुक्त राष्ट्र संघानेही घेतली आहे. महामारी काळात समाजकार्य केल्याबद्दल सोनू सूदला संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमात (यूएनडीपी) विशेष मानवतावादी कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Sonu Sood mortgages eight properties in Juhu to raise Rs 10 crore for the needy)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’