सातारा | अतिवृष्टीत डोंगर कडा अथवा दरड कोसळून पाटण, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यात ज्या दुर्घटना घडल्या तशा दुर्घटना जावली तालुक्यातील बोंडारवाडी, भुतेघर आणि सातारा तालुक्यातील सांडवली येथे घडण्याची भीती आहे. जीवितहानी टाळण्यासाठी या तीनही गावांचे कायमच पुनर्वसन तातडीने करावं, अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, ज्ञानदेव रांजणे यांच्यासह बोंडारवाडीच्या सरपंच सुनीता ओंबळे, उपसरपंच महेंद्र ओंबळे, अंकुश ओंबळे, बाजीराव ओंबळे, महादेव ओंबळे, भुतेघरचे विष्णू मानकुमरे, तुकाराम मानकुमरे, गणेश मानकुमरे, सांडवलीचे सरपंच गणेश चव्हाण, श्रीरंग केरकर, रामचंद्र केरकर, दिनकर केरकर, मनोहर केरकर, रामदास केरकर, राम पवार यांच्यासह तिन्ही गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, अतिवृष्टीमुळे बोंडारवाडी, भुतेघर, सांडवली येथे मोठे नुकसान झाले आहे. याठिकाणी डोंगर कडा, दरड गावावर कोसळण्याची भीती असून तसे झाल्यास जीवितहानी होऊ शकते. यामुळे या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शासनाच्या निकषानुसार बोंडारवाडी, भुतेघर या गावाचे वन विभागाच्या जागेत पुनर्वसन करावे. भुतेघर पूर्वी ज्या जागेत होते त्या जागेत गावठाण पुर्नवसित करावे. सांडवली गावठाणाचे पुर्नवसन लगतच्या पठारावर करण्यात यावे. याबाबत तातडीने प्रयत्न करावा अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. याबाबत पाहणी करून सकारात्मक निर्णय घेऊ असे जिल्हाधिकारी सिंह यांनी सांगितले.