कराड | पुस्तकांचे वाचन आणि प्रवास माणसाला समृद्ध करतात. विद्यार्थ्यांनी आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पुस्तकांचे वाचन अन् प्रवास करायला हवा असे प्रतिपादन ‘तीन मुलांचे चार दिवस’ या साधना प्रकाशनाच्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आदर्श पाटील यांनी केले. जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यालय, कराड येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विजय कुलकर्णी यांच्यासह इतर शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
शालेय जीवनात आपणाला अनेक प्रश्न पडत असतात. असेच काही प्रश्न आम्हाला महाविद्यालयात असताना पडले आणि त्याची उत्तरे शोधण्यासाठी आम्ही प्रवास करण्याचे ठरवले. नक्षल प्रभावित गडचिरोली, छत्तीसगढ अशा भागातून सायकल प्रवासावेळी आम्ही अनेकांशी संवाद साधला. यातून आम्हाला खऱ्या भारताची ओळख झाली, असे मत आदर्श पाटील यांनी व्यक्त केले. पाटील यांनी विद्यार्थ्यांना नक्षलवाद्यांनी त्यांना पकडून ठेवल्याचा किस्सा सांगितला. तेव्हा अनेकांच्या अंगावर शहारे आले.
‘तीन मुलांचे चार दिवस’ हे पुस्तक सध्या पुणे विद्यापीठात अभ्यासक्रमात
मूळचे कराड तालुक्यातील काले गावचे असणारे आदर्श पाटील यांनी लिहिलेले ‘तीन मुलांचे चार दिवस’ हे पुस्तक सध्या पुणे विद्यापीठात अभ्यासक्रमात घेण्यात आले आहे. ज्या वयात श्री. पाटील यांनी सायकल वरून साहसी प्रवास केला. आज त्याच वयातील विद्यार्थ्यांना त्यांचे संपूर्ण पुस्तक अभ्यासाकरिता आहे.
जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर व विद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध उपक्रम घेवून साजरा करण्यात आला. यावेळी सहवास प्रतिभावंतांचा कार्यक्रमानिमित्त लेखक श्री.आदर्श पाटील यांची मुलाखत व संवाद अशा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी त्यांनी त्यांच्या पुस्तकातील लेखनासाठी शालेय जीवनात केलेल्या मराठी अभ्यासाचा होत असलेला फायदा, नक्षलवादी व आदिवासी लोकांचे जीवन, प्रसंग व याबाबत माहिती देत, विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे देत संवाद साधला.
यावेळी सर्वाधिक वाचन करणाऱ्या विद्यार्थांना व शिक्षकांना सौ. शैलजा व श्री. मुकुंद सबनीस पुरस्कृत ‘विधायकता वाचन पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले. लहान गटात हा पुरस्कार कु. ऋचा अष्टेकर (इयत्ता- 6 वी) व मोठ्या गटात कु. वरदा चव्हाण (इयत्ता- 9 वी) या विद्यार्थांना देण्यात आला. तसेच शिक्षक गटातून सौ. अबोली फणसळकर यांना लेखक श्री. आदर्श पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारासाठी विद्यार्थी व शिक्षकांची मुलाखत / परीक्षक सौ. स्वाती भागवत, सौ. गीतांजली तासे, लेखिका सौ. माधुरी साने यांनी केले. तसेच राजभाषा दिनाचे औचित्य साधून दीपावली सुट्टीत पालकांसोबत पर्यटन केलेल्या विद्यार्थ्यांनी पर्यटनवर आधारित लिहिलेल्या 18 लेखांचे सुट्टीतील सफर हे हस्तलिखित पुस्तक प्रकाशित करण्यात आले.
दरम्यान, वि. वा. शिरवाडकर व मराठी भाषेवर आधारित विद्यार्थांनी तयार केलेले भित्तीपत्रक श्री. आदर्श पाटील, मुख्याध्यापक श्री. विजय कुलकर्णी, पर्यवेक्षिका सौ. सोनाली जोशी व भित्तीपत्रक तयार केलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. मराठी भाषा समृद्धीसाठी 300 शुद्ध शब्द विद्यार्थांना देवून शुद्ध शब्द लेखन स्पर्धा घेण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या मराठी स्वाक्षरी घेण्यात आल्या. श्री. कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी राजभाषा सप्ताह अंतर्गत सुंदर हस्ताक्षर लेखन कार्यशाळा घेवून मार्गदर्शन करण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षण सौ. रुपाली तोडकर व श्री. राहूल मोरे व सौ. चोले यांनी केले. विजेत्या वर्गास व वर्गशिक्षक यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. माधवन जोशी, रूद्र मुंढेकर, गार्गी जोशी व समर्थ शिंगण या विद्यार्थांनी वि. वा.शिरवाडकर, पु. ल.देशपांडे, विश्वास पाटील, द. मा.मिरासदार या मराठी लेखकांचे पेन्सिल स्केच काढली व शाळेच्या ग्रंथालय विभागास भेट दिली. मुख्याध्यापक श्री.विजय कुलकर्णी,पर्यवेक्षिका सौ.सोनाली जोशी, मराठी विषय शिक्षक श्री. अवधूत तांबवेकर, सौ.विद्यादेवी जाधव, सौ.स्वाती जाधव यांनी सर्व उपक्रमांचे आयोजन केले.