सातारा | नोकरीचे आमिष दाखवून व कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देत वेळोवेळी विवाहितेवर बलात्कार केल्याची तक्रार बोरगाव पोलिसात दाखल झालेली आहे. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे पंकज मोहन यादव (रा. सासपडे, ता. सातारा) असे नाव आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंकज यादव याने त्याच्या नात्यातील एका विवाहितेला बँकेत नोकरी लावतो. त्यासाठी तुला कॉम्प्युटर क्लास लावावा लागेल. मी तुला क्लास लावतो, असे आमिष दाखवून घरात कोणी नसताना तिच्याशी बळजबरी करत बलात्कार केला. यावेळी तिचे अश्लील फोटो काढून अत्याचार केले. तसेच या घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास फोटो व्हायरल करेन आणि तुझ्या नवऱ्याला व मुलाला ठार मारेन, अशी धमकी दिली.
त्यानंतर संबधित युवकाने वेळोवेळी सातारा येथे लॉजवर व घरी धमकी देत बलात्कार केला. पीडित विवाहितेने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला असता त्याने नवरा व भावाला ठार मारण्याची पुन्हा धमकी दिली. या घटनेची माहिती अखेर विवाहितेने घरच्यांना दिल्यावर त्यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी पंकज यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. पुढील तपास सपोनि डॉ. सागर वाघ करत आहेत.