कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये एकाच कुटुंबातील 3 जणांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कुटुंबाला मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलले आहे. या कुटुंबाने आत्महत्येपूर्वी फेसबुक लाईव्हसुद्धा केले होते. त्याद्वारे त्यांनी आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. 8 जानेवारी या तिघांनी एका जंगलात जात गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या कुटुंबाने आत्महत्या करताना फेसबुक लाईव्ह सुरुच ठेवले होते.
मृत व्यक्तींची नावे अशोक नस्कर, त्यांची पत्नी रिता नस्कर आणि मुलगा अभिषेक नस्कर अशी आहेत. अशोक आणि रिता यांची मुलगी पूनम एका संस्थेशी जोडलेली आहे. तिच्यावर संस्थेचे 14 लाख रुपये हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. 8 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास पूनम ज्या संस्थेत काम करत होती त्या संस्थेच्या काही महिला नस्कर कुटुंबाच्या घरी पोहचल्या. या महिलांनी यावेळी पूनम आणि तिच्या घरच्यांना अपमानित केले.
यानंतर स्वनिर्भर गोष्ठीच्या संस्थेतील महिलांनी सुरुवातीला पूनमला घरातून बाहेर काढलं आणि तिला आपल्यासोबत घेऊन गेले. त्यानंतर घरातील इतर सदस्यांनाही घराबाहेर काढत घराला कुलूप लावलं अशी माहिती तिकडच्या स्थानिक लोकांकडून देण्यात आली आहे. तसेच पूनम आणि तिच्या पतीला रस्सी बांधून संपूर्ण गावात फिरवण्यात आले आणि त्यांना एका झाडाला बांधून बेदम मारहाणसुद्धा केली. हा अपमान सहन न झाल्याने अशोक, रिता आणि अभिषेक या तिघांनी एका जंगलात जाऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्वनिर्भर संस्थेच्या 5 महिलांना ताब्यात घेतले असून आणखी काही जणांची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.