झारखंड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्रा – रांची। झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असून काँग्रेस आघाडी विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. महाराष्ट्रापुरती मर्यादित असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झारखंडमध्ये विजयी पताका फडकावली आहे.हुसैनबाद विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कमलेशकुमार सिंग विजयी झाले आहेत. बहुजन समाजवादी पार्टीचे शेर अली त्यांच्या विरोधात मैदानात होते. त्यांना १९ % मते मिळाली आहेत तर कमलेशकुमार सिंग यांना २८.५५% मते मिळाली आहेत. केरळ विधानसभेच्या पोट निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार निवडून आला होता. आता केरळनंतर झारखंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खाते खोलले आहे.

झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्च्याला घवघवीत यश मिळाले आहे. काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्च्याची आघाडी असून काँग्रेस १४ तर झारखंड मुक्ती मोर्चा २९ जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला असून मुख्यमंत्री रघुवर दास पराभवाच्या छायेत आहेत. भाजपला महाराष्ट्रा पाठोपाठ झारखंडमधील सत्ता गमवावी लागणार आहे. झारखंड विधानसभेत ८१ जागा असून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ४२ जागांची गरज आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडी ४९ जागांवर आघाडी आहे.