मुंबई : नाईट लाईफवर टीका करणारे प्रदूषित मनाचे असल्याची घणाघाती टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. नाईट लाईफचा प्रयोग अनेकांना रोजगार मिळवून देणारा आहे. शुद्ध हेतूनं सुरू होणाऱ्या या प्रयोगावर टीका करणाऱ्यांची मनं प्रदूषित आहेत,’ अशी टीका आदित्य यांनी केला आहे.
नाईट लाईफ सुरु झाल्यानंतर निर्भयासारख्या हजारो घटना घडतील अशी टीका भाजप नेते राज पुरोहित यांनी केली होती. आदित्य ठाकरे यांच्या टीकेचा रोख त्यांच्यावर असल्याचे दिसते. मुंबई नाईट लाईफ सुरु करण्याची कल्पना आदित्य ठाकरे यांनी मांडल्यानतंर त्यावर उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील याला विरोधाचे संकेत दिले होते. आज मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय होणार आहे. प्रजासत्ताक दिनापासून नाईट लाईफची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सुरुवातीला काही भागांत हा प्रयोग केला जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण शहराबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी यावर टीका केली होती. ‘नाइट लाइफ’ सुरू झाल्यास मुंबईत ‘निर्भया’ बलात्कारासारख्या हजारो घटना होतील. ही आपली संस्कृती नाही, अशी टीका भाजपच्या काही नेत्यांनी केली होती. मुंबईकरांना त्रास झाल्यास या योजनेला कडाडून विरोध करण्याचा इशाराही भाजपनं दिला होता.