परभणी प्रतिनिधी | नेत्यांचा अदब राखण्यासाठी त्यांच्या ताफ्यासमोर येणाऱ्या गाड्या बाजूला करण्याची जबाबदारी पोलीसांना देण्यात आलेली असते. मात्र परभणीमध्ये अजब प्रकार घडला असल्याचे बघायला मिळले आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या ताफ्याच्या आड येणाऱ्या रिक्षांवर कारवाही करण्याचा प्रकार प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. या कारवाहीत एक दोन नव्हे तर तब्बल ५०० रिक्षांवर कारवाही केल्याचे निदर्शनास आले आहे.
दिवाकर रावते १४ ऑगस्ट रोजी परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्या ताफ्याला परभणी शहरात काही रिक्षा आड आल्या. त्यानंतर असे प्रकार वारंवार घडल्याने परिवहन मंत्री चिडले आणि यांनी परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांना कारवाही करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी जवळपास ५०० रिक्षा चालकांवर कारवाही केली आहे. त्यामुळे १५ ऑगस्टपासून आज तागायत त्यांच्या रिक्षा कामावर नसून त्या एकाजागी उभा आहेत.
दरम्यान प्रशासनाच्या या कारवाहीमुळे रिक्षा संघटना चिडल्या आहेत. हातावरची पोटे असणाऱ्या लोकांचे संसार रिक्षाच्या भाड्यातून येणाऱ्या पैशातून चालतात अशात एवढ्या प्रमाणात रिक्षांवर केलेल्या कारवाहीमुळे रिक्षा चालक कमालीचे चिडले आहेत. त्यामुळे येत्या सोमवारी या कारवाहीच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा रिक्षा चालक संघटनेने दिला आहे. तर मंत्र्याला त्रास झाला म्हणून कारवाही केली. मात्र सामान्य नागरीकांना रिक्षावाल्यांचा रोज त्रास होतो त्याचे काय करायचे असा सवाल देखील सामान्य माणसांकडून विचारला जातो आहे.