दहिवडी | माण तालुक्यातील वरकुटे-म्हसवड येथील तलाठी दादासो अनिल नरळे (वय- 37, रा. पाणवन ता. माण) या तलाठ्याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. तक्रारदारांकडून वारस नोंदीसाठी 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी 2 हजार स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील तक्रारदार 21 वर्षीय युवक आहे. एसीबीच्या या कारवाईनंतर माण तालुक्यात खळबळ उडाली.
तक्रारदार यांना वडिलोपार्जित शेतजमिनीत त्यांच्यासह बहीणीचे नाव वारसदार म्हणून नोंद करायचे होते. यासाठी तक्रारदार याने काम सांगितल्यानंतर तलाठ्याने त्या कामासाठी 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदाराने सातारा एसीबी कार्यालयात संपर्क साधला. एसीबी विभागाने तक्रार घेवून त्याबाबत खातरजमा केली. संबंधित रक्कम दि. 1 रोजी वरकुटे म्हसवड येथे घेण्याचे ठरल्यानंतर एसीबी विभागाने सापळा लावला. लाचेची 2 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना संशयित तलाठी दादासो नरळे याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
एसीबी विभागाने संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर पंचनामा करुन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली. सांयकाळी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित तलाठ्याला अटक करण्यात आली. पोलिस अपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.