येडीयुरप्पा यांच्या नातीची गळफास घेऊन आत्महत्या; कर्नाटकात खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांची नात सौंदर्या नीरज यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बंगळुरूच्या वसंतनगर येथील फ्लॅटमध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे 3 वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते.

सौंदर्या ही येडियुरप्पांच्या पहिल्या पत्नीच्या मुलीची मुलगी होती. ती 30 वर्षांची होती. ती बंगळूरमधील एम.एस.रामय्या रुग्णालयात डॉक्टर होती. ती पतीसमवेत माऊंट कॅरमेल कॉलेजजवळील इमारतीत राहत होती. आज सकाळी राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बाऊरींग रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनुसार माहिती नुसार, सौंदर्या यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता आहे. प्रथमदर्शनी सौदर्या यांनी आत्महत्या केल्याचे दिसत असल्याचे पोलीस म्हणाले. या घटनेनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी येडियुरप्पांच्या सांत्वनासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.