Budget 2022 : इन्कम टॅक्सच्या नवीन स्लॅबमध्ये होऊ शकतात बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दोन वर्षांपूर्वी सादर झालेल्या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारने दोन स्लॅबची व्यवस्था केली होती. सरकारला आशा होती की, ते करदात्यांना आकर्षित करण्यास सक्षम असेल, मात्र केवळ 5 टक्केच करदात्यांनी नवीन स्लॅबमध्ये प्रवेश केला. हे पाहता 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार नवा इन्कम टॅक्स स्लॅब आणखी आकर्षक बनवू शकते.

टॅक्स पोर्टल क्लियरचे संस्थापक आणि सीईओ अर्चित गुप्ता म्हणतात की,”अर्थ मंत्रालयाने नवीन इन्कम टॅक्स स्लॅबबद्दल खूप विचारमंथन केले आणि त्याच्या अपयशाची कारणे शोधली. दोन टॅक्स सिस्टीम बाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे आढाव्यात आढळून आले आहे. मूल्यांकन वर्ष 2021-22 मध्ये, 5.89 कोटी करदात्यांनी रिटर्न भरले आहेत, त्यापैकी फक्त 5 टक्के म्हणजे 29.4 लाख लोकांनी नवीन स्लॅब स्वीकारला आहे.”

नवी टॅक्स सिस्टीम अयशस्वी का होत आहे?
नवीन टॅक्स सिस्टीममुळे कॉर्पोरेट करदाते खूप खूश होते, मात्र पर्सनल करदात्यांनी स्वतःला त्यापासून दूर ठेवले. अर्थ मंत्रालयाला असे आढळून आले की, “नवीन टॅक्स सिस्टीममध्ये कर सवलतीचा पर्याय काढून टाकल्यानंतर तो आकर्षक राहिला नाही. त्याच वेळी, त्याचा लोकांच्या बचतीवरही परिणाम झाला, कारण बहुतेक लोकं टॅक्स वाचवण्यासाठी बचत करण्याचा आग्रह धरतात. नवीन टॅक्स सिस्टीममध्ये बचतीवरील कर सवलत पूर्णपणे रद्द करण्यात आली.”

अनेक प्रकारच्या सवलती मिळू शकतात
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पात नवीन टॅक्स सिस्टीमअंतर्गत अनेक सूट जाहीर करू शकतात. अर्चित गुप्ता यांचे म्हणणे आहे की,”काही अटींसह होम लोनवरील कर सवलत आणि स्टॅण्डर्ड डिडक्शनवर सूट यांचाही इन्कम टॅक्सच्या नवीन स्लॅबमध्ये समावेश केला जाऊ शकतो. याशिवाय, सर्वोच्च टॅक्स स्लॅबची लिमिट देखील सध्याच्या 15 लाखांवरून 20 लाखांपर्यंत वाढवता येऊ शकते.

नवीन इन्कम टॅक्स स्लॅबचे दर काय आहेत ?
इन्कम टॅक्सच्या नवीन स्लॅबमध्ये 2.5 लाख वार्षिक उत्पन्नावर कोणताही टॅक्स नाही. 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के टॅक्स लागतो. 5 ते 7.5 लाखांपर्यंत 10 टक्के आणि 7.5 लाख ते 10 लाखांपर्यंत 15 टक्के इन्कम टॅक्स भरावा लागेल. याशिवाय 10 लाख ते 12.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के, 12.5 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 25 टक्के आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के दराने इन्कम टॅक्स भरावा लागतो.

Leave a Comment