नवी दिल्ली । दोन दिवसांनंतर सादर होणार्या सर्वसाधारण अर्थसंकल्प 2022 मध्ये रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या अर्थसंकल्पात रेल्वेला आणखी निधी मिळू शकतो तसेच शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी अनेक शहरांसाठी ‘वंदे भारत’ सारख्या सेमी हायस्पीड ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली जाऊ शकते.
अर्थसंकल्पात Golden Quadrilateral रूटवर ताशी 180 ते 200 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या सेमी-हाय स्पीड ट्रेन्स चालवण्याची घोषणा केंद्र सरकार करू शकते, असा दावा सूत्रांनी केला आहे. या गाड्या वंदे भारतसारख्या असू शकतात. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींनी 75 आठवड्यात 75 वंदे भारत ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती.
6500 अॅल्युमिनियमचे डबे बनवण्याचा प्रस्ताव
सरकार अर्थसंकल्पामध्ये रोल स्टॉकवरही लक्ष केंद्रित करू शकते. सध्याच्या गाड्या पूर्णपणे बदलण्यासाठी 6500 अॅल्युमिनियम कोच, 1240 लोकोमोटिव्ह आणि सुमारे 35,000 वॅगन बनवण्याचा प्रस्ताव आहे. वास्तविक, अॅल्युमिनियमचे बनलेले डबे हलके असतात. तसेच ते कमी ऊर्जा वापरतात. छोट्या व्यापाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन रेल्वे मालवाहतुकीमध्ये EMU सुरू करू शकते.
खर्चात कपात करून तंत्रज्ञानावर भर
अर्थसंकल्पात रेल्वेचा लॉजिस्टिक खर्च कमी करण्यावर भर दिला जाऊ शकतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हा खर्च 14 टक्क्यांवरून 11 टक्क्यांवर आणण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली जाऊ शकते. या उपाययोजनांमुळे मालवाहतुकीचा खर्च चार टक्क्यांनी कमी होऊ शकतो. नवीन तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी सरकार अर्थसंकल्पात काही नव्या तरतुदी करू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.