नवी दिल्ली । राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला संबोधित केले. आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकत ते म्हणाले की,”कोरोना महामारीमध्ये भारताची क्षमता समोर आली आहे. भारतात तयार होत असलेल्या लसी संपूर्ण जगाला महामारीपासून मुक्त करण्यात आणि करोडो लोकांचे प्राण वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.”
राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात देशाच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करणाऱ्या सर्व पैलूंचा उल्लेख केला. त्यांनी गरिबांसाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांवर प्रकाश टाकला आणि कृषी जगतातील कामगिरीचाही उल्लेख केला. राष्ट्रपतींनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेले बदल ही मोठी उपलब्धी असल्याचे सांगितले.
स्टार्टअप्स ‘ही’ नवीन शक्यतांची उदाहरणे आहेत
ते म्हणाले की,”आपली स्टार्ट-अप इको-सिस्टम हे आमच्या तरुणांच्या नेतृत्वाखाली वेगाने आकार घेत असलेल्या अनंत नवीन शक्यतांचे उदाहरण आहे. सन 2016 पासून आपल्या देशात 56 विविध क्षेत्रात 60 हजार नवीन स्टार्ट-अप तयार झाले आहेत. या स्टार्ट अप्सच्या माध्यमातून सहा लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. 2021 मध्ये, कोरोनाच्या काळात, भारतात 40 हून जास्त युनिकॉर्न-स्टार्ट-अप अस्तित्वात आले, ज्यापैकी प्रत्येकाची किंमत 7,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.”
कमी किमतीचे इंटरनेट आणि मोबाईल फोन
राष्ट्रपती श्री. कोविंद म्हणाले की,”सरकारच्या धोरणांमुळे आज भारत अशा देशांमध्ये आहे जिथे इंटरनेट आणि स्मार्टफोनची किंमत सर्वात कमी आहे. भारतातील तरुण पिढीला याचा मोठा फायदा होत आहे. भारत 5G मोबाइल कनेक्टिव्हिटीवरही वेगाने काम करत आहे ज्यामुळे अनेक नवीन शक्यतांची दारे उघडली जातील. आमच्या स्टार्ट-अप इको-सिस्टमला सेमीकंडक्टरवरील भारताच्या प्रयत्नांचा मोठा फायदा होईल. भारतातील तरुणांना झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा यासाठी सरकारने अनेक धोरणात्मक निर्णयही घेतले आहेत, अनेक नवीन क्षेत्रांमध्ये प्रवेशाचे दरवाजे उघडले आहेत.”
ते म्हणाले की,”सरकारने स्टार्ट-अप्स बौद्धिक संपदा संरक्षण कार्यक्रमाद्वारे पेटंट आणि ट्रेडमार्कशी संबंधित अनेक प्रक्रिया सोप्या केल्या आहेत, ज्यामुळे त्यांना नवीन चालना मिळाली आहे. याचा परिणाम म्हणून या आर्थिक वर्षात पेटंटसाठी सुमारे 6 हजार अर्ज आले आहेत आणि ट्रेडमार्कसाठी 20 हजारांहून जास्त अर्ज दाखल झाले आहेत.”
GST कलेक्शनमध्ये तेजी
सतत सुधारत असलेल्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख करताना राष्ट्रपती म्हणाले की,”सरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे भारत पुन्हा एकदा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. देशातील GST कलेक्शन गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने एक लाख कोटी रुपयांच्या वर आहे.”
परकीय गुंतवणुकीत वाढ
ते म्हणाले की,”या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत $48 अब्जची परकीय गुंतवणूक ही भारताच्या विकासावर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा विश्वास असल्याचा पुरावा आहे. भारताचा परकीय चलनाचा साठा देखील सध्या $630 अब्जांच्या वर आहे. आपली निर्यातही झपाट्याने वाढत आहे आणि पूर्वीचे विक्रम मोडत आहेत. 2021 मध्ये एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत भारताची कमोडिटी निर्यात सुमारे $300 अब्ज किंवा 22 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होती, जी 2020 च्या याच कालावधीपेक्षा दीड पट जास्त आहे.”