Budget 2025| नवीन घराचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो लोकांसाठी दिलासादायक समोर आली बातमी आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकार आता ‘स्वामी निधी’ (SWAMIH Fund) च्या माध्यमातून अपूर्ण राहिलेल्या 40,000 घरांच्या निर्मितीसाठी मदत करणार आहे. याआधीच्या टप्प्यात या योजनेअंतर्गत 50,000 घरे पूर्ण करण्यात आली होती. ज्यामुळे अनेक कुटुंबांचे घर घेण्याचे स्वप्न साकार झाले.
काय आहे ‘स्वामी निधी’? (Budget 2025)
नोव्हेंबर 2019 मध्ये केंद्र सरकारने रिअल इस्टेट क्षेत्रातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ‘स्वामी निधी’ योजना सुरू केली होती. 25,000 कोटी रुपयांच्या या निधीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या प्रकल्पांना मदत मिळते. तसेच, घर खरेदीदारांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत नाही. या निधीचा उद्देश परवडणाऱ्या आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना घर उपलब्ध करून देण्याचा आहे.
दरम्यान, रिअल इस्टेट हा देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, अनेक प्रकल्प आर्थिक अडचणी, कायदेशीर गुंतागुंत आणि निधीअभावी रखडले होते. ‘स्वामी निधी’मुळे अशा प्रकल्पांना नव्याने चालना मिळणार आहे. यामुळे ग्राहकांचे घर खरेदीचे स्वप्न साकार होईलच, पण बांधकाम क्षेत्रात रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील.
तसेच, या योजनेमुळे बाजारात अडकलेल्या निधीला गती मिळणार आहे. यासह नवीन प्रकल्प(Budget 2025) सुरू करण्यास मदत होईल आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होईल. याशिवाय, सिमेंट, स्टील, बांधकाम साहित्य आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल.