हॅलो महाराष्ट ऑनलाईन Budget Friendly Trips Near Mumbai । मुंबईकरानो, नुकताच पावसाळा सुरु झाला असून अनेक महिन्यांनी तुम्हाला गर्मीपासून सुटका मिळाली असेल. पावसाळा म्हंटल कि हिरवळ, धुके आणि सर्वत्र निसर्गरम्य वातावरण….अशा या वातावरणात ऑफिसचा ताण सोडून मस्त असं कुठेतरी फिरायला जावं आणि निसर्गाच्या कुशीत एकरूप व्हावं असं सर्वानाच वाटत. मात्र काहीजणांची अडचण असते ती पैशाची… कारण फिरायचं म्हंटल कि राहणं, खाणं आलं, गाडीचा प्रवास आला.. त्यामुळे अनेकजण इच्छा असूनही फक्त खर्चाच्या अभावी ट्रिप कॅन्सल करतात आणि स्वतःचेच मन मारतात.. परंतु आता चिंता करू नका… आज आम्ही तुम्हाला ५ बजेट फ्रेंडली पिकनिक स्पॉट बद्दल सांगणार आहोत जी मुंबईपासून अगदी जवळच्या अंतरावर आहेत. या ट्रिप दरम्यान तुम्हाला जास्तीचे पैसेही खर्च करावे लागणार नाहीत.

१) लोणावळा (Lonavala)
लोणावळा हे महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. मुंबईपासून ८३ किमी अंतरावर असलेल्या लोणावळ्यात पावसाळ्याच्या दिवसात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. हिरवीगार डोंगररांग, धबधबे. थंड हवा, भुशी डॅम, टायगर्स लीप आणि लोणावळा लेक या ठिकाणांना दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. तुम्ही मुंबई ते लोणावळा लोकल ट्रेनने सुद्धा जाऊ शकता, किंवा बस किंवा तुमच्या स्वतःच्या गाडीने जाऊ शकत. येणे जाणे, खायचे पदार्थ आणि स्थानिक खर्च मिळून एका व्यक्तीचा खर्च हा जास्तीत जास्त १५०० रुपयांपर्यंतच जाईल.

२) माथेरान – Budget Friendly Trips Near Mumbai
मुंबईपासून सुमारे ८३ किलोमीटर अंतरावर असलेले माथेरान हे एकमेव प्रदूषणमुक्त हिल स्टेशन! आहे. पश्चिम घाटात वसलेले हे हिल स्टेशन धुक्याच्या टेकड्या आणि विहंगम दृश्ये दाखवते. माथेरान मधील लुईसा पॉइंट, पॅनोरमा पॉइंट आणि शार्लोट लेक इथे तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायला मिळेल. याठिकाणी पर्यटक स्थानिक गेस्टहाऊसमध्ये राहतात जे दोन रात्रींसाठी २००० रुपयांपर्यंत राहण्याची सुविधा देतात. माथेरान मध्ये तुम्हाला टॉय ट्रेनचा प्रवास देखील अनुभवता येईल. मुंबईवरून माथेरानला जाण्यासाठी नेरळपर्यंत लोकल ट्रेननं जा, तिथून टॉय ट्रेन किंवा शेअर टॅक्सी करा. Budget Friendly Trips Near Mumbai

३) कर्जत – Karjat
मुंबईपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेलं कर्जत हिरवळीच्या गाड्या, जंगलातील ट्रेक आणि वाहणाऱ्या धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. जास्त प्रवास न करता अगदी कमी वेळेत आणि आरामात ट्रिप करायची असेल तर कर्जत नक्कीच तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरेल . कर्जत येथील खांडस धरण, आषाणे- कोषाणे धबधबा, साळोख धरण, पाली – भूतीवली धरण, जुमापट्टी धबधबा, पळसदरी धरण हे प्रसिद्ध ठिकाणे आहेत. मुंबईपासून २ तासांपेक्षा कमी अंतरावर असलेले कर्जत हे ग्रामीण अनुभवासाठी सर्वोत्तम पावसाळी सुट्टीतील ठिकाणांपैकी एक आहे. तुम्ही अगदी बजेट फ्रेंडली पर्यटन याठिकाणी करू शकता.

४) अलिबाग – Alibag
अलिबाग हे मुंबईपासून फक्त एका फेरीने प्रवास (Budget Friendly Trips Near Mumbai) करण्याच्या अंतरावर आहे. मुंबईपासून ११० किलोमीटरवर असलेलं एक सुंदर बीच डेस्टिनेशन म्हणून अलिबाग प्रसिद्ध आहे. याठिकाणी अलिबाग बीच, आणि नागांव बीच इथे तुम्ही समुद्रकिनारी मजा करू शकता. तसेच कुलाबासारखे किल्ले एक्सप्लोर करू शकता, किनारी महाराष्ट्रीयन जेवणाचा आनंद घेऊ शकता. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सर्वात आधी गेट वे ऑफ इंडियाकडे जा.. तेथून अलिबाग साठी थेट फेरी आहे. (साधारण १५० रुपये प्रति व्यक्ती). मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, अलिबागला पावसाळ्यात कमी गर्दी असते, पण समुद्र खवळलेला असतो, त्यामुळे सावध रहा!

५) इगतपुरी – Igatpuri
मुंबईपासून जवळपास १२० किलोमीटर अंतरावर असलेले इगतपुरी हे निसर्गरम्य किल्ले, धबधबे आणि हिरव्यागार दऱ्यांनी भरलेले आहे. याठिकाणचे भातसा नदीचे खोरे, कॅमल व्हॅली आणि त्रिंगलवाडी किल्ला देशभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. इगतपुरी मधे तुम्हाला अतिशय कमी किमतीत राहण्यासाठी हॉटेल मिळतील, ज्यामुळे खिशाला सुद्धा हि ट्रिप नक्कीच परवडेल. जर तुम्हाला कमी गर्दीच शांत पर्यटनाचा अनुभव घ्यायचा असेल तर एक दिवस नक्कीच इगतपुरी ला जावा.




