नवी दिल्ली । राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू करताना संसदेत सांगितले की, सरकारने महामारीच्या दबावातही देशातील महिलांना बळ देण्याचे काम केले. थेट आर्थिक मदतीबरोबरच सामाजिक स्तरावरही बदल घडवून आणणारे अनेक निर्णय घेतले. याशिवाय देशातील 2 कोटींहून जास्त लोकांना घरे देण्यात आली.
राष्ट्रपती म्हणाले,”जन धन योजनेंतर्गत करोडो खाती उघडण्याचा उद्देश महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे हा होता आणि सरकारने त्यांच्या खात्यात रोख रक्कम पाठवून महामारीत खूप मदत केली. याशिवाय मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 वर्षे केल्यास त्यांचा शैक्षणिक व सामाजिक स्तर वाढण्यास मदत होईल. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून 8 कोटींहून जास्त महिलांना धूर आणि प्रदूषणापासून मुक्ती मिळाली.”
लष्करी शाळांमध्ये मुलींना संधी
रामनाथ कोविंद म्हणाले,”देशातील 33 मिलिटरी स्कूल आता मुलींनाही प्रवेश देत आहेत जे कौतुकास्पद आहे. महिलांना सैन्यातही कमिशन मिळाले आहे. नॅशनल डिफेन्स एकॅडमी (NDA) मध्ये महिला कॅडेट्सनाही मान्यता देण्यात आली आहे. त्यांची पहिली बॅच जून 2022 मध्ये येईल. तिहेरी तलाक हा कायदेशीर गुन्हा ठरवून सरकारने समाजाला या दुष्ट प्रथेपासून मुक्त करण्यास सुरुवात केली आहे.”
6 कोटी लोकांना शुद्ध पाणी तर कोट्यवधी लोकांना घरे मिळाली
ग्रामीण भागात पाण्याच्या पाइपलाइन टाकण्याचे काम शासनाने केले आहे. यामुळे देशातील खेड्यातील उर्वरित 6 कोटी कुटुंबांना शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे. ग्रामीण भागातील महिलांनाही याचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेतून 22 कोटींहून जास्त लोकांना घरे देण्यात आली आहेत.
MSME ला गॅरेंटेड लोन
अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या लहान आणि मध्यम उद्योगांना वाचवण्यासाठी सरकारने 4 लाख कोटी रुपयांची गॅरेंटेड लोन स्कीम जारी केली होती. या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 3 लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. महामारीशी लढा देणाऱ्या लाखो उद्योगांना या योजनेचा लाभ मिळाला.
स्टार्टअप वातावरण तयार केले, 6 लाख नोकऱ्या मिळाल्या
राष्ट्रपती म्हणाले की,”सरकारने रोजगार निर्मितीवर विशेष भर दिला आहे. देशात स्टार्टअप्ससाठी एक इकोसिस्टम तयार करण्यात आली आहे आणि आतापर्यंत या क्षेत्राने 6 लाखांहून जास्त नोकऱ्या दिल्या आहेत. असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या गणनेसाठी जारी करण्यात आलेल्या ई-श्रम पोर्टलवर आतापर्यंत 23 कोटींहून जास्त लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे.”