कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
कराड पंचायत समितीत लोकप्रतिनिधीने सुचविलेल्या आॅफलाईन कामाचे वाटप बैठकीत गोंधळ व हमरीतुमरी झाली. ठेकेदारांची दादागिरी अन् वाद यामुळे गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी आपला डॅशिंगपणा दाखवत प्रशासकीय इंगा दाखविला. तसेच पोलिस संरक्षण मागवत कामाचे वाटप होणारी बैठकच रद्द केली. यावेळी काही ठेकेदारांनी बसण्यासाठी जागा कमी पडल्याने गोंधळ झाल्याचा आरोप केला.
गावागावात जलसुविधा, स्मशानभूमी सुधारणा, क्राॅकिटकरण व पाणी पुरवठा संदर्भातील 5 लाखांच्या आतील कामे वाटपासाठी आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचायत समितीच्या सभागृहात आॅफलाईन कामे घेण्यासाठी अनेक ठेकेदारांनी गर्दी केली होती. सभागृहातील जागा बसण्यासाठी अपुरी पडल्याचे व गर्दी मोठी झाल्याचे पहायला मिळाले. परंतु काही ठराविक ठेकेदार मनमानी करत असल्याचे दिसून आले. यावेळी गटविकास अधिकारी यांनी सूचना केल्या. तरीही त्यांची अमंलबजावणी न करता गोंधळ सुरू राहिला. तेव्हा अखेर आपला प्रशासकीय इंगा दाखवत डॅशिंग गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी सर्वांनाच सभागृहाच्या बाहेर जाण्यासाठी सांगून बैठकच रद्द करून टाकली.
पंचायत समितीत सुशिक्षित बेरोजगार, मजूर सहकारी संस्था आणि अोपन ठेकेदार लायसन्स असल्याची अट असताना अनेक विना लायसन्स धारकही उपस्थित होते. त्यामुळे वारंवारं अधिकाऱ्यांनी विना लायसन्स तसेच ज्यांचा संबध नाही, त्यांनी बाहेर जाण्यासाठी सांगितले. तरीही कोणीही ऐकत नसल्याने ठेकेदारांच्यात गोंधळ होवू लागला. तसेच हेवेदावे वाढू लागल्याने बैठक रद्द करण्यात आली.
यापुढील बैठका बचत भवनला होणार : गटविकास अधिकारी
बैठकीत गोंधळ, हमरीतुमरी होवून लागल्याने तसेच काही बाहेरचेही लोक होते. त्यामुळे वरिष्ठांना कल्पना देवून सदरची मिटींग रद्द करण्यात आली. सर्वांनी एकत्रित आल्याने गोंधळ झाला. तीन विभागाचे ठेकेदार वेगवेगळे आले असते तर गोंधळ झाला नसता. यापुढील मिटींग या बचत भवनाला घेतल्या जातील, असे गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी सांगितले.