घरफोड्या करून चोरट्यांनी केले नववर्षाचे स्वागत; वाळूज परिसरात सात घरफोड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – वाळूज परिसरात वडगाव (को) येथील गट क्रमांक पाच व गट क्रमांक आठमधील एकूण बंद असलेल्या सात घरांचे कडी, कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोने, चांदी असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. सर्वजण नववर्षाच्या स्वागताला लागलेले असल्याने चोरट्यांनी हा डाव साधला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस गस्त घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

वाळूज औद्योगिक परिसरातील वडगाव (को.) गट क्रमांक 8 मधील प्लॉट क्रमांक 29 मधील समाधान यमाजी शिरसाट (31) हे त्यांच्या वरच्या खोलीत झोपायला गेले होते. त्यामुळे बंद असलेले त्याचे घर फोडून दोन हजार रुपये रोख, एक ग्रॅमची अंगठी, चांदीचे पाच शिक्के, पाच भारचा कंबर पट्टा व दोन ग्रॅमची नथ तसेच त्यांच्या शेजारी राहणारे रावसाहेब यमाजी शिरसाठ (37) हे नेहमीप्रमाणे रात्री नऊ वाजता वरच्या मजल्यावरील रूममध्ये झोपायला गेले असता त्यांचेही खालच्या मजल्यावरील बंद घर अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून आतील ऐवज लंपास केला. यात दोन हजार रुपये कॅश, गहूमणी पोत, तीन ग्रॅम देवाची चांदीची मूर्ती. तसेच याच गट नंबर आठ मधील प्लॉट क्रमांक 40 मधील विकास सपकाळ हे गावी गेले होते. त्यांच्याही घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली.

कालिदास दीपाली गायकवाड (39) यांचेही गट नंबर 5 मधील प्लॉट क्रमांक 41, 42, 43 मधील घर फोडून रजिस्ट्रीसाठी ठेवलेले 50 हजार रुपये लंपास केले. ते शेतकामासाठी 27 डिसेंबर रोजी दरेगाव पाडळी (ता.खुलताबाद, जि.औरंगाबाद) येथे गेले होते. सिद्धार्थ दळवी (40) हे सुद्धा गट नंबर 5 मधील 45 नंबरच्या घरांमध्ये राहतात. ते लग्नाला सोलापूर येथे गेले होते. त्यांच्याही घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. गट नंबर पाच प्लॉट क्रमांक 39 येथील किरण पांडुरंग (36) हे हस्ता (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) हे येथे गावी गेले होते. 25 डिसेंबर रोजी एकनाथ साळवे यांनी त्यांना फोन करून घर फुटल्याचे कळविले. त्यांच्या घरातील पाच ग्रॅम कानातील झुंबर असा ऐवज लंपास करण्यात आला. या शिवाय प्रमोद जाधव (34) गट नंबर 5 रो हाऊस क्रमांक 3 यांना कंपनीत सुट्ट्या असल्याने ते डिलिव्हरीसाठी गेलेल्या पत्नीला बुल़डाणा येथे भेटण्यासाठी 29 डिसेंबर रोजी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी या सर्व घराचे कडी कोंडी तोडून आतील मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सचिन पागोटे, पोलीस अंमलदार संघराज दाभाडे, प्रकाश गायकवाड, एस.एन.भोटकर, रोहित चिंधले यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

Leave a Comment