Bus Accident| गुरुवारी जम्मू-काश्मीर येथील अखनूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी भाविकांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात पडल्यामुळे 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामुळे सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर मृतदेहांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बस कोसळली 150 फूट खोल खड्ड्यात Bus Accident
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-पूंछ महामार्गावरील अखनूर भागातील चौकी चौरा येथे चुंगी वळणावरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. ज्यामुळे बस थेट 150 फूट खोल खड्ड्यात पडली. त्यावेळी बसमध्ये एकूण 60 प्रवासी होते. ही बस हरियाणातील कुरुक्षेत्र येथून जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील शिवखोडी येथे भाविकांना घेऊन निघाली होती. मात्र प्रवासादरम्यानच बसचा मोठा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक बसमध्ये अडकल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी धावून आले. यानंतर पोलिसांनाही अपघाताची माहिती कळविण्यात आली.
दरम्यान, जम्मू-काश्मीरचे परिवहन आयुक्त राजिंदर सिंग तारा यांनी सांगितले की, अपघातग्रस्त बस शिवखोडीकडे जात होती. मात्र चुंगी वळणावरून जात असतानाच कदाचित ड्रायव्हर डुलकी लागली असावी ज्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. कारण की, बस वळण घेण्याऐवजी सरळ पुढे गेली आणि थेट खड्ड्यात पडली. या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आता जखमींना अखनूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.