लालपरी धावली | साताऱ्यातून तब्बल 22 दिवसांनी पोलीस बंदोबस्तात बससेवा सुरू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातून तब्बल 22 दिवसानंतर पहिली लालपरी आज मंगळवारी दि. 30 रोजी पोलीस बंदोबस्तात स्वारगेटकडे रवाना झाली. शिवशाही बस नंतर लालपरी बस आता सातारा- स्वारगेट सुरू झाल्याने प्रवाशांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे. याच बरोबर सातारा- सातारारोड ही बस सुद्धा ग्रामीण भागात पहिली बस सुरू करण्यात असून 14 कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक रेश्मा गाडेकर यांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदान बरोबर राज्यातील बस स्थानकाबाहेर कर्मचाऱ्यांनी गेल्या 22 दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांसोबत शासनाच्या अनेक बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले मात्र एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण हा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आजही राज्यातील अनेक व स्थानकाबाहेर कर्मचारी आंदोलनावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कर्मचाऱ्यांनी कामावरती परतावे असे आव्हान केले होते. तरीसुद्धा अनेक कर्मचारी आंदोलनावर ठाम राहिल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला.

सातारा जिल्ह्यात 8 नोव्हेंबर रोजी लालपरीची चाके जागेवर थांबलेली होती. त्यानंतर तब्बल 22 दिवसांनी आज मंगळवारी दि. 30 नोव्हेंबर रोजी पहिली बस सातारा- सातारा रोड आणि सातारा -स्वारगेट अशा दोन मार्गावर बस धावण्यास सुरुवात झाली आहे. लालपरी सुरु झालेले प्रवास वर्गातून समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.