हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बदलत्या जीवनशैलीमुळे आणि असंतुलित आहारामुळे अनेक आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यापैकी एक गंभीर आजार म्हणजे कॅन्सर (Cancer). भारतात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या हा आजार लाखो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे. यामध्ये महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या ग्रीवेचा कॅन्सर आढळण्याचे प्रमाण अधिक आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता लवकरच रूग्णांना कॅन्सर प्रतिबंधक विशेष लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण आणि आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, पुढील पाच ते सहा महिन्यांत ही लस उपलब्ध होईल. ही लस ९ ते १६ वर्षे वयोगटातील मुलींना दिली जाणार आहे. जेणेकरून भविष्यात कॅन्सरचा धोका टाळता येईल.
कॅन्सर प्रतिबंधक लसीचा महिलांसाठी मोठा फायदा
महिलांमध्ये कॅन्सरची समस्या गंभीर होत असताना ही लस मोठी उपयुक्त ठरणार आहे. सध्या या लसीच्या संशोधनाचा अंतिम टप्पा सुरू आहे. त्यामुळे लवकरच चाचण्या पूर्ण होतील. लसीकरण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिली जाईल. ही लस कॅन्सर होण्याची शक्यता लक्षणीय प्रमाणात कमी करेल.
कधीपासून सुरू होणार लसीकरण?
जर सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्या तर पुढील पाच ते सहा महिन्यांत लसीकरण सुरू होईल. सुरुवातीला ती ९ ते १६ वर्षे वयोगटातील मुलींना दिली जाणार आहे. त्यानंतर तिचा उपयोग व्यापक स्तरावर केला जाईल. या लसीमुळे महिलांना भविष्यात कॅन्सरपासून संरक्षण मिळेल. तसेच महिलांमध्ये वाढणाऱ्या कॅन्सरच्या प्रमाणात देखील होईल.
दरम्यान, भारतामध्ये दरवर्षी हजारो महिला कॅन्सरमुळे प्राण गमावतात. अनेकवेळा या आजाराचे निदान उशिरा होते, ज्यामुळे उपचार कठीण होतात. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ही लस मुलींना योग्य वयोगटात मिळाल्यास त्यांना भविष्यात कॅन्सरचा धोका राहणार नाही.