सातारा | साताऱ्यातील गडकर आळी परिसरात मंगळवारी दुपारी शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने छापा टाकून दोघांकडून सुमारे 10 किलो वजनाचा गांजा पकडला. तर कराड तालुक्यातील काले येथे सोमवारी दि. 23 रोजी दुपारी भैरोबाचा इनाम नावच्या शिवारातील ऊस व सोयाबीन पिकाच्या शेतात लावलेली गांजाची मोठी 5 झाडे व इतर लहान रोपे पोलिसांनी छापा टाकून जप्त केली.
सातारा येथे कारवाईत सागर गायकवाड (वय- 24, रा. गडकर आळी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी पोलिसांच्या डीबी पथकाला गांजाची वाहतूक होवून त्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने सापळा रचला होता. तेव्हा दुचाकीवर संशयित युवकाकडे पोते सापडले. मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी पोत्याची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये प्लास्टीकचे पाच रॅपर केलेले बंडल होते. पोलिसांनी त्याबाबत चौकशी केल्यानंतर संशयिताने त्यामध्ये गांजा असल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ सर्व बंडल व दुचाकी जप्त करून संशयिताला ताब्यात घेतले. पोनि संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमित माने, लैलेश फडतरे, स्वप्नील कुंभार, पंकज मोहिते यांनी कारवाईत सहभाग घेतला.
तर कराड पोलिसांनी हिंदूरांव गणपती पाटे (वय- 65, रा. काले, ता. कराड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नांव आहे. पोलिस उपाधिक्षक डॉ. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्यासह पोलिस पथकाने ही कारवाई केली, याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, डीवायएसपी डॉ. रणजित पाटील यांना काले येथे शेतात गांजाची झाडे असल्याची माहिती गोपनिय बातमीदाराकडून समजली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना बरोबर घेत शेतात छापा टाकला. त्यानुसार ऊस व सोयाबीन शेतात गांजाची लहान मोठी झाडे असल्याची आढळून आली. पोलिसांनी गांजाची सर्व झाडे जप्त केली. त्याचे वजन सुमारे दीड किलो असून किंमत अंदाजे 2 हजार रुपये आहे. शेतात गांजा लावणाऱ्या हिंदूराव पाटे याला पोलिसांनी नोटीस दिली आहे. याबाबत सरकारतर्फे फौजदार राजू डांगे यांनी खबर दिली आहे. कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे तपास करीत आहेत.