गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय!! आता ‘या’ 13 भाषांमध्ये CAPF कांस्टेबल परीक्षा देता येणार

CAPF Constable Exam language
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) कॉन्स्टेबल पदांसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. हे नवीन भाषेचे स्वरूप जानेवारी 2024 पासून लागू होईल असेही गृहमंत्रालयाने जाहीर केलं आहे. या निर्णयामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.

गृह मंत्रालयाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे देशभरातील लाखो उमेदवारांना त्यांच्या मातृभाषेत किंवा प्रादेशिक भाषेत परीक्षा देता येणार आहे. या निर्णयाअंतर्गत सीएपीएफ कॉन्स्टेबल पदासाठी आता मराठी, बंगाली, आसामी, गुजराती, पंजाबी, उर्दू, मल्याळम, कन्नड, तामिळ, तेलगू, ओडिया, मणिपुरी आणि कोकणी अशा एकूण 13 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा देता येणार आहे.

गृहमंत्रालयाने याबाबत एक निवेदन जारी करत म्हंटल आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृह मंत्रालयाने CAPF मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. CAPF मध्ये स्थानिक तरुणांची संख्या वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे असं गृह मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हंटल आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे स्थानिक तरुणांच्या नोकरीच्या संधी वाढणार आहेत.