प्रेमात पडलाय? लग्न करायचय? जात-धर्माची अडचण आहे? तर मग हा कायदा तुम्हाला माहित हवा

0
87
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कायद्याचं बोला | टाळेबंदीच्या कळात घरात बसून राहिल्याने अनेक तरुण मुला-मुलींची लग्ने पालकांनी उरकून घेतली आहेत. तसेच अनेक प्रेमी-युगुलांना नेहमीच्या धावपळीच्या जगण्यातून निवांत वेळ मिळाल्याने त्यांनीही याकाळात लग्न केले आहे. टाळेबंदीच्या नियमांमुळे कमी उपस्थितीत आटोपशीर लग्न करावे लागले आहे. कोणत्याही प्रकारचा जातीधर्माचा शिक्का आपल्या लग्नाला लागू नये म्हणून बऱ्याच तरुणांनी नोंदणी पद्धतीने विवाहास प्राधान्य दिले आहे. प्रेमात जात धर्म न पाहता आंतरजातीय आंतधर्मीय विवाहही केले जात आहेत. तर असा जात धर्म न पाहता विवाह करण्याचा अधिकार विशेष विवाह कायदा, १९५४ ने दिलेला आहे. पुढे लग्न करू इच्छिणाऱ्या आणि आपल्या लग्नास कोणत्या जातीधर्माचा शिक्का न लागता पूर्णपणे ऐहिक पद्धतीने, कमी खर्चात विवाह करू इच्छिणाऱ्यांनी या कायद्याच्या तरतुदी जाणून घेणे महत्वाचे आहे.

१) विशेष विवाह कायद्यानुसार कोणत्याही जाती धर्माचे स्त्री-पुरुष विवाह करू शकतात.

२) विशेष विवाहाकरिता इच्छुक वधू-वर यांना ३० दिवस अगोदर विवाह अधिकाऱ्याकडे नोटीस द्यावी लागते.

३) महाराष्ट्र राज्यात सर्वसाधारणपणे जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात ही विवाह नोंदणी कार्यालये आहेत. या कार्यालयाची सविस्तर यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Organization या सदराखाली Offices याठिकाणी उपलब्ध आहे.

४) विशेष विवाह पद्धतीने विवाह करण्यासाठीची पात्रता :

  • विशेष विवाह करणारा पक्षकार अविवाहित असावा किंवा विवाहित असल्यास पूर्वीच्या लग्नातील जोडीदारापासून घटस्फोटित असावा किंवा तो जोडीदार हयात नसावा.

  • विवाहेच्छुक वधूवरांपैकी कोणीही मंदबुद्धी किंवा मनोविकृत नसावेत.

  • वधूवरांपैकी कोणासही वारंवार वेडाचे झटके/ फिट येत नसावेत.

  • नोटीस च्या दिवशी विवाहेच्छुक वधूचे वय 18 वर्षे आणि वराचे वय 21 वर्षे पूर्ण असावे.

  • उभयतांमध्ये निषिद्ध नातेसंबंध नसावेत निषिद्ध नातेसंबंधा बाबतची अधिक माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Activities या सदराखाली Marriage Registration याठिकाणी उपलब्ध आहे.

  • विशेष विवाहाची नोटीस देतेवेळी वधूवरांपैकी किमान एक पक्षकार विवाह अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात नोटीस च्या दिनांकापासून मागील सलग तीस दिवस वास्तव्य करत असला पाहिजे.

५) विशेष विवाहाच्या नोटीस सोबत कोणती कागदपत्रे जोडावी?

I .वधू-वर यांचा –
अ. वयाचा पुरावा – जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला इ.
पक्षकार अशिक्षित असेल किंवा जन्माची नोंद कोठेही नसेल, तर जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील वैद्यकीय दाखला.

ब. रहिवास पुरावा – उदा. स्वतःच्या नावाचे वीज देयक/दूरध्वनी देयक/मिळकत कर पावती/लिव्ह ॲन्ड लायसन्सची प्रत.

II. वधू किवा वर घटस्फोटीत असल्यास घटस्फोटासंबंधीचा कोर्ट हुकूमनामा.

III. वधू ही विधवा किंवा वर हा विधुर असल्यास पूर्वीच्या जोडीदाराचा सक्षम प्राधिकारी यांचेकडील मृत्यूचा दाखला.

IV. आवश्यक तीन साक्षीदारांची ओळखपत्रे व रहिवास पुरावा. सर्व पुरावे साक्षांकित (attested) केलेले असावेत.

अॅड. स्नेहल जाधव
(लेखिका कायदादूत नावाचे फेसबुक पेज चालवून कायद्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतात)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here