कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
जातीच्या दाखल्यामुळे प्रलंबित असणारी प्रकरणे मार्गी लावण्यासाठी संबंधित प्रांताधिकाऱ्यांना पत्रे पाठवावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात आज झाली. या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, समाज कल्याण निरीक्षक के.आर. पांडव उपस्थित होते.
सहायक आयुक्त कामत यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. त्यानंतर त्यांनी सविस्तर आढावा सांगितला. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंध 1989) ॲट्रॉसिटी अंतर्गत व नागरी हक्क संरक्षण अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांच्या सद्यस्थितीबाबत समावेश होता. जानेवारीमध्ये 10, फेब्रुवारीमध्ये 3, मार्चमध्ये 9, एप्रिलमध्ये 2, मे मध्ये 10, जूनमध्ये 5, जुलैमध्ये 3, ऑगस्टमध्ये 10, सप्टेबरमध्ये 5, ऑक्टोंबरमध्ये , नोव्हेंबरमध्ये 3 व डिसेंबर 2019 मध्ये 3 असे एकूण 70 आणि जानेवारी 2020 मध्ये 5 गुन्हे घडलेले आहेत. पोलीस तपासावरील 15 प्रकरणे प्रलंबित आहेत. 10 प्रकरणामध्ये जातीचा दाखला नाही अशी माहिती कामत यांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकारी देसाई यांनी या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. ते म्हणाले, उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे वगळता प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावावीत. दोषारोप पत्र पाठवावे जेणेकरुन पीडितांना अर्थसहाय्य देता येईल. जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी संबंधित प्रांताधिकाऱ्यांना माझ्या सहीने पत्र पाठवावे. पिडीतांना अर्थसहाय्य देण्याबाबतही कार्यवाही व्हावी, असेही ते म्हणाले.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.