हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| इथून पुढे विज्ञान शाखेसह व्यावसायिक शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र (Caste Verification Certificate) जमा करणे बंधनकारक असेल. त्यामुळे “ज्या विद्यार्थ्यांना या शाखांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी वेळेच्या अगोदरच जात पडताळणी समितीकडे अर्ज करावा म्हणजे प्रवेशावेळी त्यांना कोणतेही अडचण येणार नाही. मात्र अर्जामध्ये काही त्रुटी जाणवल्यास प्रमाणपत्र मिळण्यास विलंब लागेल” असे आवाहन पडताळणी समितीकडून करण्यात आले आहे.
ही कागदपत्रे आवश्यक असणार
जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ओबीसी, एसबीसी, एनटी-व्हीजेएनटी व एससी, एसटी यांसह विद्यार्थी राजकीय व्यक्ती आणि नोकरदार अर्ज करू शकतात. या अर्जासोबत त्यांना, ‘१५-ए’ प्रतिज्ञापत्र, नमुना नं. ३ व १७ अर्ज प्रमाणपत्र द्यावे लागेल. तसेच शैक्षणिक आणि महसूल पुरावे देखील जमा करावे लागतील ज्यावर जात नमूद आहे. या अर्जामध्ये काही त्रुटी जाणवल्यास किंवा काही संशयास्पद वाटल्यास अर्जदाराची चौकशी करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रांची पूर्ण खात्री झाल्यानंतरच जात प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यामुळे ज्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र हवे आहे त्यांनी वेळेत यासाठी अर्ज करावा.
कोणत्या जातींसाठी किती वर्षांचा पुरावा लागतो?
1) एससी, एसटी जातीचा उल्लेख असलेले 1950 पूर्वीचे शैक्षणिक किंवा महसूली पुरावे लागतात.
2) व्हीजेएनटी जातीचा उल्लेख असलेले 1961 पूर्वीचे पुरावे लागतील.
3) ओबीसी, एसबीसी जातीचा उल्लेख असलेले 1967 पूर्वीचे पुरावे लागतील.
अर्ज कोठे करायचा?
ज्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र काढायचे आहे त्यांना सर्वात प्रथम ऑनलाईन अर्ज करावा लागेल. तो अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह जात पडताळणी समिती कार्यालयात अर्ज द्यावा लागेल. प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्वात प्रथमhttps://bartievalidity.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर जावे.