हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गॅंगने हौदोस घातला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोयता गॅंग कडून पुण्यात ठिकठिकाणी हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरामध्ये या गुंडांचा वाढत प्रभाव पाहता पोलिसांपुढे सुद्धा मोठं आव्हान उभं राहील आहे. त्याच पार्श्वभूमीवर या गुंडांचा बंदोबस्त करणाऱ्या पोलिसाना बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
कोयता गँगचा आरोपी पकडून दिल्यास ३ हजारांचं बक्षीस देण्यात येईल. बंदूक जवळ बाळगणाऱ्या आरोपीला 10 हजार बक्षीस असेल तर वॉन्टेड आणि फरार आरोपी पकडून दिल्यास त्यालाही 10 हजारांचं बक्षीस देण्यात येईल. मोक्का किंवा एमपीडीएतील आरोपी पकडल्यास 5 हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. पुणे पोलीस आयुक्तालयातील पूर्व आणि पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्तांनी हे बक्षीस जाहीर केलं आहे.
दरम्यान, विद्येचं माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून कोयता गॅंगने अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. हातात कोयते घेऊन ही गँग थेट दुकानांमध्ये तोडफोड करायची. याशिवाय पार्किंगमध्ये उभ्या गाड्यांची तोडफोड सुद्धा कोयता गॅंग कडून करण्यात येत आहे . कोयत्याने मारहाणीच्या घटना आणि ठिकठिकाणी झालेलं फायरिंग यामुळे पुण्याची प्रतिमा मलीन होत आहे तसेच यानिमित्ताने कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.