औरंगाबाद | औरंगाबाद शहरात परिसरात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरीएंटचा रुग्ण आढळून आल्याने मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. यापुढे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपूर्ण कुटुंबाची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल, असे मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले आहे.
प्रशासनाच्या वतीने तिसऱ्या लाटेची तयारी सुरू करण्यात आली आहे. ऑक्सिजन, ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता, बालकांसाठी विशेष कोविड केअर सेंटर अशी तयारी करण्यासाठी आली आहे, असे असतानाच शहर परिसरात डेल्टा विषाणूचा रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण महिनाभरापूर्वी पॉझिटिव्ह आला असला तरी खबरदारी म्हणून मनपा प्रशासनाने विविध उपाययोजना राबवत आहे. त्यानुसार आता एखाद्या कुटुंबात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास त्याच्या संपूर्ण कुटुंबाची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. यापुर्वी कुटुंबाच्या सोयीनुसार ॲंटीजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी केली जात होती. परंतु आता आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असेल, असे मंडलेचा यांनी सांगितले.
शहराच्या एंट्री पॉइंटवर 1167 निगेटिव्ह –
मनपाच्या आरोग्य विभागातर्फे मंगळवारी शहराच्या सहा एंट्री पॉइंटवर 1 हजार 167 जणांची ॲंटीजेन कोरोना चाचणी करण्यात आली. चिकलठाणा येथे 219, हर्सुल टी पॉइंट 149, कांचनवाडी 184, झाल्टा फाटा 200, नगर नाका 178, दौलताबाद टी पॉइंट येथे 267 जणांची ॲंटीजेन कोरोना चाचणी करण्यात आली. यात सर्वजण निगेटिव्ह आढळले आहेत.