बारामतीत नेमकं चाललंय काय? EVM मशिन ठेवलेल्या गोदामातील CCTV कॅमेरे सकाळपासून बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) काळात बारामती संघात मतदानाच्या दिवशी झालेल्या पैसे वाटपाच्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अशातच आता बारामती मतदारसंघातून (Baramati Constituency) आणखीन एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी मतदान झाल्यानंतर EVM मशिन ठेवलेल्या गोदामातील CCTV कॅमेरे आज सकाळपासून बंद असल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया (Laxmikant Khabiya) यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर तब्बल 45 मिनिटे बंद राहिलेले सीसीटीव्ही फुटेज पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे, गेल्या 7 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघात मतदान पार पडले होते. यानंतर सर्व ईव्हीएम मशीन विधानसभा मतदारसंघ गोदामात म्हणजेच स्ट्रॉगरूममध्ये आले होते.

याचदरम्यान आज सकाळी लक्ष्मीकांत खाबिया यांना ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या गोदामातील सीसीटीव्ही फुटेज बंद असल्याचे निदर्शनात आले. यानंतर काही चुकीचा प्रकार घडू नये त्यामुळे लक्ष्मीकांत खाबिया यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची आयोगाने तातडीने दखलही घेतली. त्यानंतर, गोदामातील सीसीटीव्ही पुन्हा सुरू करण्यात आले. तर दुसऱ्या बाजूला, हे सीसीटीव्ही फुटेज काही तांत्रिक कारणांमुळे बंद पडले असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान घडलेल्या प्रकाराबाबत माध्यमांशी बोलताना लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले की, “बारामती मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन ज्या गोदामात ठेवलेले आहेत, त्या गोदामातील सीसीटीव्ही सकाळी 10:25 पासून 45 मिनिटांपासून बंद आहेत. ज्यामुळे काही काळं बेरं तर नाही ना याची शंका येत आहे. आम्ही आधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधत आहोत. बंद पडलेले सीसीटीव्ही सुरू करण्यासाठी टेक्निशियन्स उपलब्ध नाहीत. पोलीस म्हणत आहेत, आम्हाला काही आदेश नाहीत. त्यामुळे येथे काय चाललेय कळेना”