औरंगाबाद – मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि बीड जिल्ह्यांतील काही भागांत सोमवार ते बुधवार या कालावधीत हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडू शकतो, असा अंदाज परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम विभागाने व्यक्त केला.
विद्यापीठाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक ताशी 30 ते 40 किलोमीटर राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मंगळवारी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व हिंगोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक ताशी 30 ते 40 किलोमीटर राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
बुधवारी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक ताशी 30 ते 40 किलोमीटर राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी दिली.