भीक म्हणजे देणगी, वर्गणी; चंद्रकांत पाटलांची सारवासारव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यांनतर आता त्यांनी सारवासारव केली आहे. भीक म्हणजे देणगी, वर्गणी असा असा अर्थ आहे, मी चुकीचे असं काहीही बोललो नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, शाळा सुरु केल्याने मी त्या भाषणात महापुरुषांबद्दल आदरच व्यक्त केला आहे. फुले- आंबेड्करांबाबत मी लोकांना चांगली माहिती देत होतो. वेळप्रसंगी भीक मागून त्यांनी शाळा सुरु केल्या असं मी भाषणात म्हंटल. भीक म्हणजे देणगी किंवा वर्गणी असा त्याचा अर्थ होतो. मी चुकीचे असं काहीही बोललो नाही, विनाकारण वाद वाढवला जातोय असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा कडक भाषेत समाचार घेतला. कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेकर किंवा महात्मा फुले यांनी लोकवर्गणीतुन आणि स्वतःचे पैसे खर्च करून शाळा उभारल्या , त्यांनी भीक नाही मागितली. परंतु भीक हा शब्द वापरून चंद्रकांत पाटलांनी या तिन्ही महापुरुषांचा अपमान केला आहे. त्यामुळे फुले शाहू आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या सर्व जनतेने चंद्रकांत पाटलांचे विधान गांभीर्याने घ्यावं. चंद्रकांत पाटलांनी मंत्रिपदासाठी काय भीक मागितली हे महाराष्ट्राला माहित आहे, त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा फक्त निषेध करून चालणार नाही तर यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे असं अमोल मिटकरी म्हणाले.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते-

पैठणमधील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटलांनी वादग्रस्त विधान केले. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली. त्याकाळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरी सुद्धा महापुरुषांनी तेव्हा शाळा उभ्या केल्या. मात्र, लोक शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर विसंबून राहतात. त्याकाळात लोक दहा रुपये देणारे होते. आता दहा-दहा कोटी रुपये देणारे आहेत, असे पाटील यांनी म्हंटले आहे.