मीच संपादक, माझाच मुलाखतकार, माझीच मुलाखत; बावनकुळेंचा उध्दव ठाकरेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. नुकतीच खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, ‘या देशात आता ‘एनडीए’ नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे. एनडीएमध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत’ असे वक्तव्य केले आहे. आता उद्धव ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्याची ठिणगी भाजप पर्यंत पोहोचली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. मीच संपादक, माझाच मुलाखतकार, माझीच मुलाखत असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना बावनकुळे यांनी भलंमोठं ट्विट केलं आहे. मी, माझा पेपर, स्वकियांशी माझा झालेला सामना, मीच संपादक, माझाच मुलाखतकार,माझीच मुलाखत… भन्नाट! “हिंदुत्ववादी विचारांची ज्वलंत मशाल मिठी नदीत विझवून सोनिया गांधींच्या सेनेसमोर मुजरा करणारे उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करत आहेत. तुम्हाला तुमच्या आमदारांचं नेतृत्व करता आलं नाही. ते तुमच्या नाकर्तेपणामुळे नाकाखालून निघून गेले. मुख्यमंत्री असताना तुम्ही मातोश्री बाहेर पडले नाहीत आणि आता लोकांना दोष देत आहात” असा टोला ठाकरेंना लगावला आहे

 

पुढे बोलताना, कुटनीतीला कुटण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही. कारण २०१९ साली युतीत निवडणूक लढून तुम्ही महागद्दारी केली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. तेव्हांच तुम्ही नितीमत्ता पायाखाली तुडवली होती. त्यामुळे घरात बसून निती-अनितीच्या गप्पा तुम्ही मारु नका.  “घराणेशाही टिकवण्यासाठी एकत्र आलेल्या ‘इस्ट इंडिया‘ कंपनीचं कडबोळं आता लोकशाही टिकवण्याच्या गप्पा मारत आहेत. मी, माझं कुटुंब आणि माझा मुलगा एवढाच विचार करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या तोंडून लोकशाही वाचवण्याच्या गप्पा ऐकणं म्हणजे मोठा विनोदच आहे” अशा शब्दात बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत, “बऱ्याच वर्षांनंतर या देशात ‘एनडीए’ नावाचा काहीतरी अमिबा जिवंत असल्याचं कळलं आहे. खर म्हणजे, नरेंद्र मोदींना छत्तीस पक्षांची गरज नाहीये. त्यांच्या ‘एनडीए’मध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना लगावला होता.