ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशा; भाजपकडून 5 तिखट सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सामना वृत्तवाहिनीला दिलेली एक मुलाखत प्रसिद्ध झाली. उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाखतीतून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची तोफ डागली. मात्र ठाकरेंच्या या मुलाखतीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशा आहे. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं म्हणत बावनकुळे यांनी ठाकरेंना ५ प्रश्न केले आहेत.

याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत म्हंटल कि, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असं आव्हानच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.

1) दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय?

2) 1993च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता ?, हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का?

3) सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात?

4) राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात?

5) उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता?

उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की, हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे, असं आव्हानच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या प्रश्नांची उत्तरे देतात का? तसेच संजय राऊत यावर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.