टीम, HELLO महाराष्ट्र । अँसीड हल्ला पीडितेच्या संघर्षाची कहाणी सांगणाऱ्या ‘छपाक’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज आज रिलीज झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोणची मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे.
इतर येऊ घातलेल्या सिनेमात आपण नेहमी दीपिकाच्या सुंदर लुकवर लक्ष ठेऊन असतो. मात्र या सिनेमात दीपिका एका अँसीड हल्ला पीडितेच्या भूमिकेत दिसणार आहे त्यामुळं तिच्या अंगावर काटा आणणाऱ्या लुकबद्दल सध्या चर्चा होत आहे. तरुणींवर होणारे अँसीड हल्ले आणि त्यानंतर त्यांना जे यातनादायी जीवन जगावे लागते याचे विद्रुप वास्तववादी वर्णन या चित्रपटात पाहायला मिळेल असं ट्रेलरवरून दिसत आहे.सिनेमाच्या ट्रेलरवरून दीपिकाचा परिपक्व अभिनय, अंगावर काटा आणणारे संवाद आणि मेघना गुलजार यांचं वास्तववादी दिग्दर्शन ही या ट्रेलरची जमेची बाजू आहे.
अँसीड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. मात्र या सिनेमात दीपिका साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचं नाव ‘मालती’ आहे. मार्च महिन्यात दीपिकाचा फर्स्ट लूक रिव्हील झाला होता, तेव्हाच प्रेक्षकही अवाक झाले होते. दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मस्सी यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर वास्तवादी घटनांवर आधारित चित्रपट बनविण्यात कल्पक असलेल्या मेघना गुलजार याही वेळी प्रेक्षकाना एक चांगली कलाकृती घेऊन येत असल्याचं या चित्रपटाच्या विषयावरून दिसत आहे. मेघना यांनी मागच्या काही वर्षात राजी, तलवार यासारख्या सिनेमातून वास्तवदर्शी कथांची मांडणी योग्यप्रकारे हाताळत चांगले सिनेमे प्रेक्षकांना देत स्वतःला सिद्ध केलं आहे.
दीपिकाने आपल्या करिअरमधील सर्वात आव्हानात्मक भूमिका साकारत असल्याचं म्हटलं जातं. लग्नानंतर प्रदर्शित होणारा दीपिकाचा हा पहिलाच चित्रपट आहे. दीपिकाने शेवटच्या ‘पद्मावत’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. ‘छपाक’ हा चित्रपट पुढील वर्षी १० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच दिवशी अजय देवगन-काजोल यांच्या ‘तान्हाजी’ चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर छपाक चित्रपट आमने-सामने येणार आहेत.