ठाणे प्रतिनिधी । भिवंडी तालुक्याच्या पुर्णा येथील केमिकल गोदामावर नारपोली पोलिसांनी छापा टाकला. त्यात पोलिसांनी ८ लाख ३५ हजार ९०० रुपये किंमतीचा केमिकल साठा जप्त केला. तसच केमिकल मालकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तिर्थराज पाल आणि विरल गंबीया असे अटक केलेल्या केमिकल माफियांची नाव आहेत.
तालुक्यातील पुर्णा येथील द्रौपदी कंपाऊंड, एस. पी. ठक्कर येथील ए टू झेड वेअर हाऊसमध्ये केमिकलचा साठा करून त्याची परस्पर विक्री केली जात होती. शासनाची कोणतीही परवानगी न घेता ही केमिकलची विक्री केली जात होती. याचा मानवी जिवीतास व पर्यावरणास मोठा धोका होता. या सर्व प्रकाराची गुप्त माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती घेऊन तात्काळ नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांना यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार एपीआय के. आर. पाटील यांनी पोलीस पथकासह गोदामावर छापा टाकला. कार्बो या ज्वलनशील केमिकलचे ८ लाख ३५ हजार ९०० रुपये किमतीचे ४०९ प्लास्टिक व लोखंडी ड्रम जप्त केलेत. या कारवाईत केमिकल माफिया तिर्थराज व विरल या दोघांना अटक करून भिवंडी न्यायालयात हजर केलं. त्यांना न्यायलयानं १८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.