छगन भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी; म्हणाले की, जर असेच सुरु राहिले तर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| OBC कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, या मागणीला घेऊन ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे (Navnath Wagmare) गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण करत होते. परंतु आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांच्या मागण्यांबद्दल सकारात्मक भूमिका दाखवल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे. याचवेळी मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठी मागणी केली आहे. ज्यात त्यांनी ओबीसींसाठी राजकीय आरक्षण मागितले आहे.

आज माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “आम्ही लोकसभेवर जायचे नाही, विधानसभेवर जायचे नाही. जर असेच सुरु राहिले तर विधानसभा आणि लोकसभेतही आम्हाला आरक्षण हवं, अशी मागणी करावी लागेल. लढाई अजून संपलेली नाही. तर ती सुरु झाली आहे. त्यामुळे आता घरी बसून चालणार नाही. आपल्या हक्कांसाठी वणवा पेटवावा लागेल”

त्याचबरोबर, “आम्ही कुणालाही धमक्या देत नाही. आपली लढाई अजून संपलेली नाही. त्यांना दुसरे ताट द्या, आमच्या ताटातले देऊ नका. लोकशक्ती एकत्र आली तर धनशक्तीचा पराभव होईल. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या आम्ही पाठींबा देतो. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. अन्याय झालेले समाज हळूहळू पुढे यावे, यासाठी आरक्षण आहे” असेही छगन भुजबळ यांनी म्हटले.

दरम्यान, आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जालन्यातील वडीगोद्री येथे जाऊन लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. यावेळी आम्ही लक्ष्मण हाकेंच्या सर्व मागण्या मान्य करत असल्याचे सांगितलं. त्यानंतर आपले उपोषण स्थगित करत लक्ष्मण हाके म्हणाले की, “आमच्या मागण्या मान्य करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याने आम्ही आंदोलन तात्पुरते उपोषण मागे घेत आहोत. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा मैदानात उतरु”